Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीचित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन

कोल्हापूर : नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या माध्यमातून जगभरातील वेगळ्या आणि आशयघन चित्रपटांचे महोत्सव कोल्हापुरात भरविण्यात त्यांचा पुढाकार होता. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष, सिने दिग्दर्शक, कला समीक्षक आणि चित्रकार अशी ओळख होती. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या कलाक्षेत्राचा चालता बोलता इतिहास हरपला अशा शब्दांत कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

नुकतेच दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे ‘सुमित्रा भावे चित्रपट महोत्सव’ झाला. या महोत्सवाच्या आयोजनात ते आघाडीवर होते. रविवारी, त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान ब्रेन हॅमरेज झाल्याने ते कोमात होते. सोमवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चंद्रकांत जोशी हे कलाक्षेत्राशी संबंधित विविध संस्थेशी निगडीत होते. सध्या ते कलानिकेतन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी होते. तसेच न्यू हायस्कूल येथे ते चित्रकला शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. न्यू हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध नाटके बसविली. विद्यार्थीप्रिय शिक्षक, सांस्कृतिक संस्थांचे आधारस्तंभ होते. याशिवाय त्यांनी अभिनेता नाना पाटेकर, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड यांना घेउन ‘सूत्रधार’हा सिनेमा काढला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

याशिवाय ‘टक्कर, निर्मला मच्छिंद्र कांबळी, जगजननी अंबाबाई’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातही ते काही वर्षे सक्रिय होते. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते कलाक्षेत्रात सक्रिय राहिले. त्यांच्या पश्चात मुले पत्रकार गोपाळ जोशी, अभिनेता हृषीकेश, श्रीपूजक अनिरुद्ध, मुलगी संगिता, भावंडे, नातवंडे असा परिवार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -