Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीFIFA : फिफाचा ज्वर चढला...!

FIFA : फिफाचा ज्वर चढला…!

फुटबॉलचा महाकुंभमेळा अर्थात फिफा (FIFA) वर्ल्ड कपला रविवारी दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ झाला. पहिल्या सामन्यात यजमान कतारवर इक्वेडोरने मात करत, यजमानांना पहिल्याच सामन्यात पराभूत करण्याचा इतिहास रचला.

फिफा विश्वचषक सुरू होताच मुंबईसह आसपासच्या परिसरात फुटबॉलचा ज्वर चढलेला पहायला मिळत आहे. आवडीचा संघ, पसंतीचे खेळाडू कशी कामगिरी करतात, याकडे शालेय विद्यार्थी, युवा वर्ग, तरुण-तरुणी, फुटबॉल चाहते डोळे लावून बसलेले आहेत. जेतेपदाचे दावे केले जात आहेत. चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगत आहेत. मेस्सी, रोनाल्डो, केन, नेयमार ही नावे वारंवार कानावर पडत आहेत. फुटबॉल विश्वचषक सुरू झाल्याने मैदाने, समुद्रकिनारे येथे मुले फुटबॉल खेळताना दिसत आहेत. पेनल्टी, गोल, डिफेंडर, स्ट्रायकर, कॉर्नर यासह फुटबॉलशी संबंधित संज्ञा लहानगे, चाहते यांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहेत. हा वर्ल्ड कप फिव्हर एन्कॅश करण्यासाठी बाजारपेठांवरही विश्वचषकाचा फिवर चढलेला दिसत आहे. ब्रँडेड शोरूमपासून स्थानिक दुकानांमध्ये संघांच्या, खेळाडूंची नावे असलेल्या जर्सी, ध्वज तरुणाईला आकर्षित करत आहेत.

जगभरात फुटबॉलचे वातावरण सेट झाले आहे. आता केवळ फुटबॉल खा, फुटबॉल प्या, फुटबॉल झोपा आणि स्वप्नातही फुटबॉलच असा माहोल जगभर सेट झाला आहे. या स्पर्धेत भारताचा संघ प्रत्यक्षात सहभागी नसली तरी येथील क्रीडा चाहत्यांच्या जिभेवर सध्या फुटबॉलच्या चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. हेच वातावरण समजून घेत बाजारपेठाही संपूर्ण फुटबॉलच्या रंगात रंगून गेल्या आहेत. नुकतेच भारतात पहिल्यांदाच महिला अंडर-१७ चा फिफा वर्ल्डकप झाला. त्यामुळे मुलींमध्येही या खेळाबाबत असलेली आवड अधिक वाढली आहे. त्याचे पडसाद सध्या दिसत आहेत.

सामन्यादरम्यान आपल्या आवडत्या संघाला प्रत्यक्ष मैदानात जाऊन सपोर्ट करू न शकणाऱ्या चाहत्यांनी सामन्यांच्या तारखा, वेळा राखून ठेवून हे सामने पाहण्याची योजना आखली आहे. कोणता संघ जिंकणार? याचे दावे मुले करत आहेत. कोणता खेळाडू चमकणार? त्याचे अंदाज व्यक्त करत आहेत. कोणत्यातरी एका ठिकाणी क्लब तसेच घरामध्ये जमून त्या त्या विशिष्ट सामन्याचा आनंद घेण्यासाठीचे प्लॅन विश्वचषकाआधीच तयार झाले होते. आता हातात संघाचा झेंडा आणि अंगावर टी-शर्ट चढवून हे सारे फुटबॉल वेडे चाहते विश्वचषकाची मजा आणि आनंद घेण्यात रंगून जात आहेत.

या वर्षीच्या फिफा विश्वचषकाचे थीम साँग ‘हय्या हय्या’ असून ते त्रिनिदाद कार्डोना, डेव्हिडो आणि आयशा यांनी संगीतबद्ध केले आहे. फुटबॉलचे हे गाणे लहानलहान मुलांना तोंडपाठ झाले आहे. ते गुणगुणताना ऐकायला मिळत आहे. फिफा विश्वचषकात गोल, खेळाडू, मैदान आदींची जितकी क्रेझ असते, त्यापेक्षाही जास्त वेड हे फिफाच्या थीम साँगचे असते. हे ‘हय्या हय्या’ गाणे अनेकांनी आपली रिंगटोन म्हणून सेट केले आहे. तसेच ‘गीव मी फ्रिडम’, शकिराचे ‘वाका वाका’ अशा आधीच्या विश्वचषक स्पर्धांच्या गाण्यांचीही चलती आहे.

ब्रँडेड शोरूममध्ये नावाजलेल्या संघांच्या, खेळाडूंच्या जर्सीज डिस्प्लेवर झळकत आहेत. फुटबॉलचे किटही विक्रीकरिता उपलब्ध आहेत. ग्राहकांना या वस्तूंकडे आकर्षित करण्यासाठी संघातील खेळाडूंचे कटआऊट फोटोही लावण्यात आले आहेत. स्थानिक ब्रँडची दुकाने, बाजारांमधील साधी दुकाने अशा वस्तूंनी फुलून गेली आहेत. परदेशी खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंचे फेस मास्कही दुकानांत उपलब्ध आहेत. केवळ भारतीय फुटबॉल संघच नाही, तर अनेक परदेशी संघांचे झेंडेही विक्रीकरिता बाजारात उपलब्ध आहेत.

कोणी स्पेन, कोणी पोर्तुगाल, कोणी जर्मनी, अर्जेंटिना तर कोणी इटलीच्या संघांना सपोर्ट करत आहेत. त्यातही काहींचे विशेष खेळाडू आवडते आहेत. अशा या प्रत्येकाला आपल्या आवडत्या खेळाडूबद्दलचे प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करायचे असते. येथील टॅटूचे वेडे तरुण आपल्या फुटबॉलपटूंचे टॅटू काढू लागले आहेत. यात सर्वात लक्ष वेधून घेत आहेत त्या हेअरस्टाईल. खेळाडूंच्या हेअरस्टाइलप्रमाणे मुले आपली हेअरस्टाइल करत आहेत. त्यामुळे सलूनमध्ये अशा प्रकारच्या हेअरस्टाइल करून दिल्या जात आहेत.

फुटबॉलप्रेमींमध्ये विश्वचषक सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे. दरम्यान लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा वॉर सुरू आहे. एकूणच काय तर मुंबईसह आसपासच्या परिसरात फिफाचा ज्वर चढलेला पाहायला मिळत आहे.

-ज्योत्स्ना कोट-बाबडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -