Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीपडळकर प्रकरणी फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

पडळकर प्रकरणी फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल जबाबदार पोलिसांना निलंबित करावे तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या विषयावर स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. अध्यक्षांनी ती दालनातच नाकारली होती. त्यामुळे ही सूचना कशी योग्य आहे, हे स्पष्ट करताना फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमच सादर केला. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर आटपाडीत काही लोकांनी दगडफेक केली. लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. मारहाण करणाऱ्या लोकांनी यासाठी डंपरमधून लाठ्याकाठ्या, दगडांचा साठा आणला होता. आणखी एका वाहनातून सोडावॉटरच्या बाटल्या नेण्यात आल्या होत्या. पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली.

या हल्ल्यासाठी तेथे २००-२५० लोक जमले होते. पोलिसांनीच हा तपशील पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंदवला आहे. पोलिसांनीच याचे चित्रिकरण केले. पोलिसांच्या डोळ्यासमोर या घटना घडत असतील, तर त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गोपीचंद पडळकर तसेच त्यांचे बंधू रामानंद पडळकर यांनी गाडी भरधाव नेऊन स्वतःचा जीव वाचवला. परंतु पोलिसांनी वेगाने वाहन चालवल्याबद्दल त्यांच्याविरुद्धच कलम ३०७ खाली गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने ट्विटरवर कशी अद्दल घडवली, म्हणून शाबासकी दिली. ज्या लोकांनी हा हल्ला केला त्यांचे वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद घेतानाचे अनेक फोटो आहेत. पोलिसांनी काय कारवाई केली, तर पडळकर यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला तो पळाला म्हणून निलंबित केले. ही कारवाई होऊ शकत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारीच कट रचत असतील, तर त्यावर कारवाई होणार की नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला.

विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. लोकप्रतिनिधींना जीवानिशी संपवण्याचा प्रयत्न लोकशाहीला मारक ठरेल. गोपीनाथ मुंडे शरद पवारांविरुद्ध जोरदार टीका करत होते. पण, जेव्हा मुंडे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला तेव्हा पवार यांनी त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका, असेही त्यांनी बजावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला उत्तर दिले. गोपीचंद पडळकर किंवा अशा कोणत्याही लोकप्रतिनिधीला पुरेसे संरक्षण दिले जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -