Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजEntertainment : मनोरंजन

Entertainment : मनोरंजन

‘दिल मलंगी’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त

एका विलक्षण कथा कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, दीपा भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सद्गुरू एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्यावेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील परब करीत आहे. ‘दिल मलंगी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा मुहूर्त मुंबई, मढ येथील ‘शनाया’ या आलिशान ठिकाणी नुकताच करण्यात आला. या प्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेता चिन्मय उद्गीरकर, अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी, नारायण जाधव, विनम्र भाबल, निर्माते रमाकांत गोविंद भोसले, दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे, दिग्दर्शक सुनील परब यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘दिल मलंगी’ या अॅक्शन फँटसी चित्रपटाची कथा प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या सरळमार्गी, स्वप्नाळू सतेज ढाणे पाटील या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. महाविद्यालयीन जीवनातच त्याचं खुल्लम खुल्ला प्रेम होतं… पण ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं ती निव्वळ आपला टाइमपास करतेय, हे लक्षात आल्यावर ‘प्रेम’ या संकल्पनेवरचा त्याचा विश्वास उडतो. साहजिकच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने तो मुंबई गाठतो. बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर तो जाहिरात एजन्सीचे सर्वेसर्वा हर्षवर्धन मराठे यांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो. मात्र ‘मुंबई नगरी’तल्या दैनंदिन धकाधकीच्या प्रवासाला कंटाळून या शहराचा निरोप घेण्याचे ठरवितो. ही गोष्ट हर्षवर्धन यांना खटकते, ते सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम सुरू होतो आणि त्याच्या आयुष्याचे चक्र फिरू लागते… उत्कंठा शिगेला पोहोचविणारी ही फँटसी मनोरंजनाचं अनोखं सरप्राईज असणार आहे.

शर्वरी साकारणार ‘कुन्या राजाची गं तू रानी’तील ‘गुंजा’

स्टार प्रवाहवर १८ जुलैपासून सुरू होतेय नवी मालिका ‘कुन्या राजाची गं तू रानी’ डोंगरवाडीसारख्या छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या मात्र मोठी स्वप्न पाहणाऱ्या गुंजाची गोष्ट या मालिकेतून उलगडेल. गुंजा म्हणजे एक रानफळ. गुंजाचं झाड औषधी असतं, त्याचा पाला आपण गोड पानात खातो. गुंज्याची सगळी फळं वजनाला परफेक्ट एका भाराची असतात, म्हणून सोनं तोलत असताना ग्रामीण भागात आजही दोन गुंज, पाच गुंज सोनं असं म्हटलं जातं. रानातल्या या मौल्यवान फळावरूनच गुंजाला गुंजा हे नाव पडलं. अभिनेत्री शर्वरी जोग या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मुळची कोल्हापूरची असणाऱ्या शर्वरीने वयाच्या ५ वर्षांपासूनच कथाकथन, बालनाट्यांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक एकांकिकांमध्ये तिने आपली छाप सोडली. अभिनयाच्या याच वेडापायी शर्वरीने मुंबई गाठली आणि तिचा मालिका विश्वात प्रवेश झाला. गुंजा ही शर्वरीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. शर्वरीप्रमाणेच गुंजाचं ही स्वप्न आहे खूप शिकून आपल्या आईला शहरात घेऊन जायचं. याच स्वप्नांचा पाठलाग करत गुंजा आपलं ध्येय साधणार आहे.

गुंजा या भूमिकेबद्दल सांगताना शर्वरी जोग म्हणाली, “स्टार प्रवाहने दिलेली ही संधी माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे. गुंजाबद्दल सांगायचं तर अतिशय खेळकर, निखळ आणि आत्मविश्वासू असं हे पात्र आहे. तिला शिकून खूप मोठं व्हायचं आहे. गुंजा डोंगरवाडीची भाषा बोलते. तिचे तिचे असे काही खास शब्द आहेत. मी मूळची कोल्हापूरची असल्याने गुंजाची भाषा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. गुंजाचा लूकही वेगळा आहे. गुंजामुळे माझी पाण्याची आणि उंचीची भीती दूर पळाली. मी पाण्यातही शूट केले आहे आणि ६० फूट उंच टाकीवरही. सायकल चालवायलाही नव्याने शिकले. त्यामुळे गुंजा या पात्राने मला खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे. असेच म्हणायला हवे.”

अबोली मालिकेत सुरू होत आहे नवं पर्व

एक वर्षाच्या लीपनंतर अबोली आणि अंकुशची होणार का भेट?

स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आलंय. काही दिवसांपूर्वीच अंकुशचा अपघात झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातात अंकुशचं निधन झाल्याचं जरी सांगण्यात आलं असलं तरी अंकुश जिवंत असल्याचा ठाम विश्वास अबोलीला आहे. अंकुशच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी अंकुशच्या दीर्घायुष्यासाठी तिने प्रार्थना केली आहे. अबोलीचं हे निस्सीम प्रेम तिची आणि अंकुशची भेट घडवून आणेल का? याची उत्सुकता वाढली आहे.

मालिकेच्या कथानकाने एक वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे अंकुश आणि अबोलीमधील विरहाला एक वर्ष उलटून गेलं आहे. त्यामुळे अबोली-अंकुशची भेट व्हावी ही प्रेक्षकांची देखील इच्छा आहे. ही भेट होणार की मालिकेचं कथानक नाट्यमय वळण घेणार हे अबोली मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी पाहायला विसरू नका अबोली मालिकेतलं हे नवं पर्व सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -