Saturday, April 20, 2024
Homeकोकणरायगडअलिबाग, मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक स्थितीत

अलिबाग, मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक स्थितीत

खडताळ, पाले पुलांची लवकरच होणार पुनर्बांधणी

अलिबाग (वार्ताहर) : अलिबागसह मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक झाले आहेत. यातील खडताळ आणि सहाण बायपास येथील पाले पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खडताळ पुलासाठी १० कोटी, तर पालेसाठी साडेसात कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. रेवदंडासह अन्य पुलांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. अलिबाग, मुरुड तालुक्यात ४४ लहान २५ मोठे असे एकूण ६९ पूल आहेत. यापैकी १३ पुलाचे स्ट्रक्चकल ऑडिट करण्यात आले असून, पैकी आठ पूल धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत.

या पुलांच्या पुनर्बांधणीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले असून, रेवदंडा पुलासाठी, खडताळ पुलासाठी दहा कोटी, एकदरा पाच कोटी, सहाण पाले साडेसात कोटी, आवास अडीच कोटी, तर सासवणे पुलासाठी ८० लाख पुनर्बांधणी कामासाठी खर्च होणार आहेत. रेवदंडा, एकदरा पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे, तर उर्वरित पुलांसाठी प्रक्रिया सुरू असून, धोकादायक पुलावरून अवजड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अलिबागजवळील खडताळ पूल हा ब्रिटिशकालीन असून, दोनशे वर्षे पुरातन आहे. रेवदंडा पूल हा १९८४ साली बांधलेला असून, त्याला ३८ वर्षे झाली आहेत. इतर पूलही चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बांधलेले असून त्यांचे बांधकाम जीर्ण झालेले आहे.

पुलाचे प्रस्ताव मंजूर झालेले असून, बजेटमध्ये निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रिया करण्यात आलेली असून, लवकरच पुलांची कामे सुरू होणार असल्याचे सुखदवे यांनी सांगितले. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या अानुषंगाने बांधकाम विभागही सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -