Friday, March 29, 2024
Homeमहत्वाची बातमीम्हाडाच्या परीक्षेबाबतच्या अफवांना बळी पडू नका

म्हाडाच्या परीक्षेबाबतच्या अफवांना बळी पडू नका

मंत्री जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

मुंबई : म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका. कुणालाही पैसे देऊ नका. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार आहे, असे सांगतानाच अफवा अशाच सुरू राहिल्या तर वेळ आल्यास मीच ही परीक्षा रद्द करेन, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना आवाहन करताना हात जोडून अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट करून हे आवाहन केलं आहे. १२ तारखेला होणाऱ्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात आहे. काही लोक पैसेही घेत आहेत असं ऐकायला आलं. असं जर कोणी रंगेहाथ पकडून दिलं तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पोलिसांमध्ये दिलं जाईल आणि गुन्हे दाखल केले जातील. कृपया विद्यार्थ्यांना कुणालाही पैसे देऊ नका, असं आव्हाड यांनी सांगितलं.

पास झालेल्यांची पुन्हा परीक्षा

म्हाडाची परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे. पास झालेल्यांचीही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमचे दिलेले पैसे वाया जातील. मला नाशिक आणि आष्टीवरून फोन आला. आष्टीचा अधिकारी पैसे घेत असल्याचं सांगितलं जात आहे. अकोल्याहून फोन आले आहेत. या फसवणुकीला बळी पडू नका. या परीक्षेत कोणताही वशिला चालणार नाही. आमचा विभाग चालू देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून पदं भरत आहोत

कोविडच्या पार्श्वभूमीवर रोजगार मिळावा म्हणून आम्ही ही पदं भरत आहोत. पण समाजातील काही गुन्हेगारी प्रवृतीची लोकं पैसे घेऊन काही करत असतील तर हातजोडून विनंती आहे त्यांच्या नादाला लागू नका. तुमचे पैसे बरबाद करू नका. नाही तर वेळ आली तर मी ही परीक्षाच रद्द करून टाकेन, असा इशारा त्यांनी दिला.

या पदांसाठी भरती

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -