Friday, March 29, 2024

डिस्कार्ड

खरं तर ‘डिस्कार्ड’ या शब्दासाठी मी मराठी शब्द शोधला. ‘टाकून देणे’, ‘फेकून देणे’ इत्यादी. पण काही म्हणा तू उच्चारताना जो जोरकसपणा जाणवतो त्यामुळे ‘डिस्कार्ड’ हा शब्द मला या लेखासाठी तरी मुद्दाम घ्यावासा वाटला.

एक अति संवेदनशील कवयित्री म्हणून असो; परंतु घरातल्या प्रत्येक माणसांवर मी जितके जीवापाड प्रेम करते तितकेच प्रेम माझे घरावर आणि घरातल्या प्रत्येक वस्तूंवर आहे.

आपण आपल्याला आवश्यक असणारी वापरण्यायोग्य आवडीची वस्तू घेतो आणि ती वापरतोही; परंतु आपल्याकडे वाढदिवस व मंगलप्रसंगी तसेच सणासमारंभाच्या वेळी एकमेकांना भेटी देण्याची पद्धत आहे. या भेटी म्हणजे ‘दागिना’, ‘वस्त्र’, ‘वस्तू’ इत्यादी. अतिशय प्रेमपूर्वक आपल्याला आवडतील या उद्देशाने आपल्याला दुसऱ्यांनी दिलेल्या वस्तू असतात आणि कधीकधी तर त्यांना नको असलेल्या वस्तू व्यवस्थित गिफ्ट पॅक करून फॉरवर्ड केल्या जातात. असो! पण एखाद्याने एखादी भेटवस्तू दिली, तर आपण ती जपून ठेवतो. त्या प्रसंगाची, त्या व्यक्तीची आठवण म्हणून! परंतु ती भेटवस्तू कधी आपल्याला न आवडलेली, आपल्या उपयोगाची नसतेच; परंतु आपल्याला आयुष्यात कधीच न लागणारीही असते. तरीही आपण ती घरातल्या कुठच्या तरी कोपऱ्यात ठेवून देतो. आयुष्यभरात अशा अनेक गोष्टी साठत जातात. परवा घर आवरताना मुलगी सहजच म्हणाली,‘आई, प्लीज हे सगळं डिस्कार्ड कर.’

मी आठवत गेले की साधारण चार-पाच वर्षांपूर्वी मला आठवत होते की कोणी, कोणत्या प्रसंगी, कोणती वस्तू दिली. आता तर मला तेही आठवत नाही. नाईट लॅम्प, घड्याळे, शोपीस, साड्या, ड्रेस, टॉवेल अशा कितीतरी वस्तू. खरोखरी ज्यांना ज्या वस्तूचा उपयोग आहे त्या त्यांना ताबडतोब देणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्या माघारी मुलगी ते बॉक्सही न उघडता सरळ डिस्कार्ड करणार हे मात्र निश्चितच!

योग्य वेळ, योग्य व्यक्ती बघून मी एक एक वस्तू त्यांना विचारून, जुनी असल्याचे सांगून द्यायला सुरुवात केली. मुंबईतल्या एका स्क्वेअर फूट जागेची किंमत ही कमीत कमी दहा-वीस हजार रुपयांच्या वरची असते. कोणत्या वस्तूसाठी किती जागा व्यापावी? काही प्रेमाने, काही मनावर दगड ठेवून घरातल्या वस्तू कमी केल्या. घरात खूप मोकळी जागा निर्माण झाली.

ही जागा कदाचित नवीन वस्तूंनी व्यापून जाईल. कदाचित माझ्या आवडीच्या वस्तू इथून गेल्यामुळे ती मोकळी जागा माझ्या मुलीच्या वस्तूंनी भरून जाईल. वस्तूंचे जाऊ द्या हो… आजच्या काळात सहजपणे पुढची पिढी मागच्या पिढीला डिस्कार्ड करत आहे. वृद्धाश्रम वाढत आहेत. ज्यांना घरातील वयोवृद्ध माणसांना वृद्धाश्रमात ठेवणे परवडत नाही, ती वयोवृद्ध माणसे रस्त्यावर भीक मागत फिरत आहेत. काही आत्महत्या करीत आहेत.

विचार करतेय – माणसांनी नेमक्या कोणत्या वयात आपल्याकडील कोणत्या वस्तू डिस्कार्ड कराव्यात? आणि आपल्याला कोणी डिस्कार्ड केले, तर नेमके काय करावे? कोणी देऊ शकेल का याचे उत्तर?

-प्रा. प्रतिभा सराफ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -