Thursday, April 18, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखदिलखुलास, निर्भीड निलमताई...

दिलखुलास, निर्भीड निलमताई…

जुहू तारा रोडवरील अधिश या नारायण राणे यांच्या निवासस्थानी पहिल्या मजल्यावर अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर सौ. निलमताई गप्पा मारत होत्या, तेव्हा जणू अधूनमधून उसळणाऱ्या ‘लाटा’ लीलया थोपवून धरण्यात त्यांनी राणेसाहेबांना नेहमीच भक्कम साथ दिल्याचे जाणवत होते.

दीपक परब

माझे पती केंद्रीय मंत्री नारायण राणे, मोठा पुत्र निलेश आणि छोटा मुलगा नितेश हे तिघे राजकारणात असून या तिघांचेही कार्यक्षेत्र कोकणात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सतत जाणे-येणे असते. सिंधुदुर्गात घर असल्याने तिथे अधूनमधून वास्तव्य हे करावेच लागते. रत्नागिरीत माझे माहेर आणि सिंधुदुर्गात सासर. दोन्हीकडे विशेषतः मालवण-कणकवलीत वास्तव्य आणि वावर जास्त असला तरी सर्वाधिक आवडते ती मुंबईच, असे सौ. निलमताईंनी स्पष्ट केले. कोकणात गाव आणि घर असल्याने जेव्हा तिथे आम्ही असतो त्यावेळी तिथल्या लोकांशी जवळून संपर्क हा येतोच. तिघेही राजकारण, समाजकारणात असल्याने जिथे असू तिथे दिवसभर लोकांचा राबता असतोच. चर्चा, मार्गदर्शन, विविध प्रकारची छोटी-मोठी मदत, काही समस्या, प्रश्न घेऊन मोठ्या आशेने, अपेक्षेने लोक आलेले असतात. त्यांचे प्रश्न सहजगत्या सोडविले जात असल्याने लोकांचा आम्हा सर्वांवर खूप विश्वास आहे. त्यामुळेच जिथे कुठे जातो तिथे लोकांची गर्दी तुम्हाला दिसेल. लोकांचे या तिघांवर आणि संपूर्ण राणे कुटुंबावर खूप प्रेम आहे, जिव्हाळा आहे. असं सगळं असलं तरी कधीतरी प्रायव्हसी हवी, असे नक्की वाटते, असे निलमताईंनी आवर्जून सांगितले.

‘माझा राजकारणाचा पिंड नाही, त्यामुळे मी त्यात जास्त रस घेत नाही. पण हे तिघे राजकारणात असल्याने जिथे जातो तिथे किंवा कोकणात गावाला गेलो, तर तिथे महिला जास्त संख्येने येतात. त्यांच्याशी बोलणं होतं. त्यांच्या समस्या असतात. त्याच्यासाठी काही करावं असं वाटलं म्हणून जिजाई महिला बचत गट यासारखे बचत गट स्थापन केले. कोकणात कोकम, कैरी, काजू यांसारखी अनेक मौल्यवान फळे असून त्यांच्यापासून कित्येक उत्पादने तयार केली जाऊ शकतात. पण त्यासाठी प्रामुख्याने बाजारपेठ उपलब्ध व्हायला हवी. ते सर्व करणे आता शक्य आहे. कारण राणेसाहेबांकडे सध्या असलेले सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री पद हे त्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यांच्या खात्यात महिलांसाठी बऱ्याच योजना आहेत. ज्यामुळे महिलांना, मुलींना प्रशिक्षण, रोजगार उपलब्ध होईल. तसेच छोटा-मोठा उद्योग, धंदा सुरू करणे शक्य होईल. उदाहरणार्थ महिलांसाठी ड्रेस डिझायनिंग, ब्यूटिपार्लरचे प्रशिक्षण आणि पुढे उद्योग अशा बऱ्याच योजना आहेत. त्याचा लाभ कोकणातील महिलांना मिळवून देण्यासाठी विशेष काम करायचे आहे.’

महिलांनी राजकारणात यावं, असं मला वाटत नाही. त्यांनी आपलं घरच सांभाळलेलं बरं. पण ज्यांना आवड आहे त्यांनी मात्र राजकारणात यायला हवं. माझ्या सुनांपैकी कोणी राजकारणात येतील, असं मला वाटत नाही. पण पुढचं काही सांगू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आता राजकारण आयुष्याचाच एक भाग झाला आहे. राजकारणात पेशन्स हा महत्त्वाचा भाग आहे.बरेचदा काही काही घटनांमुळे प्रचंड ताण येतो. कोणीही कुणाच्या घरापर्यंत नेऊ नये, हे माझं ठाम मत आहे. खोटेनाटे आरोप कुणी करू नयेत आणि सर्व दिवस हे सारखे नसतात, याची जाण समोरच्यांनी ठेवायला हवी. देवावर माझी खूप श्रद्धा आहे. देवाने आम्हाला भरभरून दिले आहे. नगरसेवक पदापासून राज्याचा मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असा चांगला प्रवास सुरू आहे. देवच सर्वांना तारून नेतो. चांगले केले, तर तुमचे चांगलेच होते यावर माझी श्रद्धा आहे. मला सगळं काही मिळालंय. साहेब मुख्यमंत्री झाले आणि निलेशला मुलगा म्हणजे आम्हाला नातू झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले, तर शिवसेनेतून साहेब बाहेर पडले तो आयुष्यातील आतापर्यंतचा नावडता क्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्या नशिबात असेल, तर ते तुम्हाला मिळणारच हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत व आणखी होतील. पद नसतानाही काम करत राहायला हवे. पक्षासाठी सतत काम केले पाहिजे. पक्षासाठी केलेले काम कधीच वाया जात नाही, असे त्या म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -