Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखधोनी आणि द्रविड; आदरार्थी व्यक्तिमत्त्व

धोनी आणि द्रविड; आदरार्थी व्यक्तिमत्त्व

भारताच्या क्रिकेट जगतातील दोन आदरार्थी व्यक्तिमत्त्व म्हणून राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी या माजी कर्णधार, क्रिकेटपटूंचे नाव घेतले जाते. गेले पाच दिवस दोघेही चर्चेत आहेत. सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाची अनोखी झलक पेश करताना चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) चौथे जेतेपद मिळवून दिले. चेन्नईसह धोनीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असतानाच काही तासांच्या फरकाने ‘द वॉल’ द्रविडची भारताच्या वरिष्ठ (सीनियर) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची बातमी धडकली. काही तांत्रिक बाबींमुळे बीसीसीआयच्या अधिकृत घोषणेला थोडा विलंब होणार आहे. मात्र, हेड कोचसाठीची द्रविडची नियुक्ती क्रिकेटप्रेमींना सुखावून गेली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तिन्ही स्पर्धा जिंकून देणारा धोनी हा भारताचा नव्हे, तर जगातील एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील २००७मध्ये झालेला पहिला-वहिला टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारताने जिंकला. सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीच्या कर्णधारपदाखाली भारताने २०११मध्ये मायदेशात झालेल्या वनडे वर्ल्डकपवरही नाव कोरले. २००८मध्ये कसोटी कॅप्टन्सी आल्यानंतर भारताने २०१३मध्ये इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. झारखंडच्या धोनीमधील नेतृत्वगुण हेरणाऱ्यांचे आभार मानावे तितकेच कमी. त्याच्याकडे कर्णधारपद कसे आले, याची एक रंजक कथा आहे. ‘भारताचा संघ २००७मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी कर्णधारपद राहुल द्रविडकडे होते. त्यावेळी मीही इंग्लंडला होता. नेतृत्वाचा परिणाम फलंदाजीवर होत असल्याने यापुढे नेतृत्व करायचे नाही, असे त्याने मला सांगितले. मी सचिनला कर्णधारपदासाठी विचारले. मात्र, सचिनने नकार देताना धोनीचे नाव सुचवले. तू आणि द्रविड कर्णधारपद स्वीकारण्यास नकार देत असाल, तर संघाचे काय होईल, असा प्रश्न मी केला. मात्र, आपल्याकडे कुशल नेतृत्वगुण असलेले एकाहून एक क्रिकेटपटू असल्याचे सचिनने सांगितले. भारताची कर्णधारपदाची धुरा धोनीकडे आली’, असा गौप्यस्फोट बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी पुढे केला. मात्र, धोनीच्या रूपाने भारताला एक सर्वोत्तम कर्णधार लाभला. केवळ झटपट नव्हे तर तिन्ही प्रकारांत त्याने त्याच्या नेतृत्वाची अनोखी छाप पाडली.

महेंद्रसिंग धोनीने २०१४मध्ये प्रथम कसोटी क्रिकेटला अलविदा केला. २०१७मध्ये वनडे क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर गेल्या वर्षी (१५ ऑगस्ट २०२०) त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला तरी आयपीएलच्या माध्यमातून धोनी खेळत आहे. त्याच्या कुशल नेतृत्वाची झलक पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. यंदा अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सला हरवत चेन्नई सुपर किंग्जनी चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. ही सर्व जेतेपदे धोनीच्या कर्णधारपदाखालील आहेत. धोनीच्या कॅप्टन्सीचे वैशिष्ट्य म्हणजे तो सहकाऱ्यांमध्ये सीनियर आणि ज्युनियर असा भेदभाव करत नाही. प्रत्येक क्रिकेटपटूशी आपणहून संवाद साधतो. तसेच प्रत्येक क्रिकेटपटूवर विश्वास दाखवून त्याला पुरेपूर संधी देतो. धोनीचे क्रिकेटमधील योगदान पाहता बीसीसीआयने नुकत्याच सुरू झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्ती केली आहे. भारताचे एकमेव टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जेतेपद त्याच्या नेतृत्वाखाली मिळाले आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला नक्कीच होईल.

राहुल द्रविड हे भारताचे एक खणखणीत नाणे आहे. कुठलेही काम असो, त्याला पूर्णपणे न्याय द्यायचा, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ‘द वॉल’ म्हणून स्वत:ची अनोखी छाप पाडलेल्या द्रविडने निवृत्तीनंतर प्रशिक्षक बनण्याचे ठरले. ४८ वर्षीय राहुल सध्या बीसीसीआयच्या बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख म्हणून काम पाहत आहे. यापूर्वी, १९ वर्षांखालील तसेच भारत ‘अ’ संघाचे कोचची भूमिका बजावली आहे. मे महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही द्रविड हा प्रशिक्षक होता. या माजी महान क्रिकेटपटूची आता मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा करार २०२३पर्यंत असेल. टी-ट्वेन्टी विश्वचषकानंतर १४ नोव्हेंबरनंतर तो पदभार स्वीकारेल. मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी तो एनसीएचे प्रमुखपद सोडेल. सीनियर संघाचा प्रशिक्षक म्हणून राहुलला यापूर्वीही विचारणा झाली होती. मात्र, त्याने ग्रासरूटला काम करणे पसंत केले. एनसीएमध्ये नवी पिढी घडवली जाते. त्यामुळे द्रविडने येथे लक्ष केंद्रित केले. युवा क्रिकेटपटू हे भविष्य असते. त्यामुळे १९ वर्षांखालील तसेच भारत ‘अ’ संघाचे काम पाहिले. २००७नंतर भारताला टी-ट्वेन्टी आणि २०११नंतर वनडे वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. झटपट प्रकारातील कामगिरी ठीक असली तरी प्रमुख स्पर्धा किंवा वर्ल्डकपमध्ये मोक्याच्या क्षणी भारताचा खेळ ढेपाळत आहे. पहिल्या-वहिल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (डब्लूटीसी) भारताने फायनलपर्यंत धडक मारली तरी अंतिम फेरीतील न्यूझीलंडविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला आहे. टी-वर्ल्डकपनंतर झटपट क्रिकेटच्या नेतृत्वात बदल अपेक्षित आहे. नवा कर्णधार आणि नवा प्रशिक्षक यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र, अनुभवी द्रविडमुळे नव्या कर्णधाराचे दडपण कमी होईल. धोनी आणि द्रविड हे कायम क्रिकेटशी जोडले गेले आहेत. दोघेही क्रिकेटला समर्पित आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची सांघिक कामगिरी आणखी बहरेल, यात दुमत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -