Tuesday, April 23, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : कर्नाक पुलाचे पाडकाम; रेल्वेची तत्परता

अग्रलेख : कर्नाक पुलाचे पाडकाम; रेल्वेची तत्परता

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसनजीक असलेल्या दीडशे वर्षांपूर्वीच्या कर्नाक पुलाचे पाडकाम मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासनाने ज्या तत्परतेने व कार्यक्षमपणे हाताळले याबद्दल मुंबईकर समाधानी आहेतच. पण रेल्वे व महापालिका प्रशासनाचे काम अभिनंदनीय आहे, असे म्हटलेच पाहिजे. मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी रेल्वे गाड्या या मुंबईच्या रक्तवाहिन्या आहेत. कोरोनाचे संकट व लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर जवळपास पासष्ट ते सत्तर लाख मुंबईकर लोकल्समधून रोज प्रवास करीत आहेत. नैसर्गिक किंवा तांत्रिक कितीही संकटे आली तरी मुंबईच्या लोकल्स धावत राहिल्या पाहिजेत, हे रेल्वे प्रशासनापुढे मोठे आव्हानच असते. देशातील कोणत्या महानगरापेक्षा मुंबईतील उपनगरीय रेल्वे ही अत्यावश्यक सेवा आहे. दोन-चार मिनिटे लोकल्स उशिरा धावत असल्या तरी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर असलेले प्रवासी अस्वस्थ होतात, हे वास्तव आहे. मुंबईची लोकल ही वेळापत्रकानुसार धावावी ही मुंबईकरांची किमान अपेक्षा असते. लोकल वेळेवर धावत आहेत व लोकलमध्ये शिरायला मिळाले, यानेच मुंबईकर सुखावतो. मुंबईकरांना महागाईची पर्वा नसते, पण लोकल वेळेवर यावी ही त्यांची अपेक्षा असते.

लोकल वाहतूक हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गेल्या तीस वर्षांत मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली, परप्रांतीयांचे लोंढे वाढले आणि लोकलचे प्रवासीही वाढतच राहिले. लोकलचे डबे नऊ होते ते बारा झाले, आता अनेक लोकल्सचे डबे पंधरा झालेत तरीही गर्दी कमी होत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी दर वर्षी गाड्यांची संख्या वाढत असते, आता वातानुकूलित लोकल्स धावू लागल्या आहेत तरीही वेळापत्रक बिघडू नये, अशी मागणी प्रवाशांची कायम असते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील कर्नाक उड्डाणपूल पाडणे ही काळाची गरज होती. ब्रिटिशांच्या काळात उभारलेल्या या पुलाला दीडशे वर्षे होऊन गेली होती, अशा प्रकारच्या पुलाचे आयुष्य सर्वसाधारणपणे शंभर वर्षे असते. एवढा जुना व ऐतिहासिक पूल पाडणे तोही कमीत कमी वेळात हे रेल्वे व महापालिकेपुढे मोठे आव्हान होते. कर्नाक उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने सत्तावीस तासांचा जम्बो मेगाब्लॉक जाहीर केला होता. विशेष म्हणजे या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व उपनगरी गाड्या व लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या केल्याचे घोषित केले होते. प्रवाशांना अगोदर माहिती असावी म्हणून रेल्वे प्रशासन दोन आठवडे त्याची प्रसिद्धी करीत होते. लोकांनी पर्याय शोधावा किंवा आपल्या कामाचे नियोजन करावे, हा त्यामागचा हेतू होता. प्रवाशांची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केले हे मान्य करावेच लागेल.

जुना कर्नाक पूल उभारण्याचे काम १८६६-६७ मध्ये सुरू झाले व १८६८ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जेम्स रिवेट्ट कर्नाक हे बॉम्बे प्रेसिडन्सीचे १८३९ ते १८४२ या काळात गव्हर्नर होते, त्यांचे नाव या पुलाला देण्यात आले. यापूर्वी माझगाव येथील हॅकॉक पूल हटविण्यात आला. हा पूल १८७९ मध्ये उभारण्यात आला होता. १८७० च्या अगोदर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कर्नल फ्रॅन्सिस हॅकॉक हे प्रेसिडेंट होते, त्यांचे नाव या पुलाला दिले होते. लोअर परळ येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हा १९१८ मध्ये उभारला होता. दादर येथील पूर्व-पश्चिम जोडणारा लोकमान्य टिळक पूल हा १९२५ मध्ये उभारला आहे. महालक्ष्मी पूल १९२० मध्ये, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पूल १८९३ मध्ये ग्रँट रोड येथील उड्डाणपूल १९२१ मध्ये उभारला आहे. या सर्व पुलांना शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. आज ना उद्या त्यांच्या जागी नवे पूल उभारणे आवश्यक आहेच.

जुना पूल पाडणे व नवा पूल उभारून तो वाहतुकीसाठी खुला करणे हे काही एखादी इमारत किंवा टॉवर उभारण्यासारखे सोपे नाही. रस्ता व रेल्वेची वाहतूक त्यासाठी किती काळ बंद ठेवावी लागते व त्या काळात प्रवासी व वाहतूक व्यवस्था यांना पर्याय काय आहे याचा विचार करावा लागतो. रेल्वेवरील पुलाचे पाडकाम करताना रेल्वे वाहतूक फार काळ बंद ठेवता येत नाही. म्हणूनच कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम करताना शनिवार रात्रीपासून सोमवार पहाटेपर्यंत कामाची आखणी केलेली होती. मुंबईत लोकल रविवारी तुलनेने कमी धावत असतात पण रविवारी घराबाहेर पडणाऱ्या व पूर्व-पश्चिम जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. सत्तावीस तास लोकल नाही या कल्पनेनेच मुंबईकर हादरले होते. पण रेल्वेने पूर्वकल्पना दिल्याने बहुतेकांनी आपल्या मनाची तयारी केली होती. रेल्वेने कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम वेगाने केले. पण वेळेपूर्वी करून मुंबईकरांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. रविवारी दुपारी साडेतीन वाजता पहिली ठाणे लोकल सीएसटीहून सुटली आणि सहा वाजण्याच्या अगोदरच पनवेल लोकल निघाली हे ऐकूनच मुंबईकर आनंदित झाले. रविवारी लग्नाचे अनेक मुहूर्त होते, रविवारी अनेक उत्सव, महोत्सव होते. पण सोमवारी सकाळपासून आठवड्याच्या पहिल्या दिवशी लोकल्स नेहमीप्रमाणे धावत आहेत, हे पाहून मुंबईकर सुखावले. याचे श्रेय रेल्वे प्रशासनाला आहे. लोकल उशिरा धावतात म्हणून रेल्वेवर नेहमी खापर फोडणारे मुंबईकर कर्नाक पुलाचे पाडकाम वेळेपूर्वी पूर्ण केल्याबद्दल समाधानी दिसले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -