Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनववर्षाच्या पहिल्या आठवड्यात खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण

नव्या वर्षात रेल्वेप्रवास होणार सुखकर ; लोकलफेऱ्या वाढणार

ठाणे: कळवा येथील पूर्व आणि पश्चिम भागातील वाहनचालकांसोबतच रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचा असलेल्या खारेगाव येथील रेल्वेवरील पुलाचे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण केले जाणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून त्याचा वापर सुरू केला जाईल, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या पुलामुळे रेल्वेचे खारेगाव येथील फाटक बंद होणार असून त्यामुळे येथे होणारी वाहतूक कोंडी संपणारआहे. तसेच रेल्वेची पाचवी आणि सहावी मार्गिकाही खुली होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढून वाहतूक व्यवस्था गतीमान होऊन प्रवाशांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कळवा पूर्व आणि पश्चिम, खारेगाव, विटावा या भागांतील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेल्वेवरील पूलाचे काम गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्केही उपस्थित होते. खारेगाव येथील पूल प्रवाशांसाठी महत्वाचा असून त्यामुळे येथील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. अपघातांची संख्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या पुलाचे काम आता पूर्ण झाले असून नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात या पुलाचे लोकार्पण करून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

या पुलामुळे फाटकातून रेल्वे रूळांवरून होणारी वाहनांची ये – जा थेट थांबणार आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण घटणार असून येथे होणारी कोंडी सुटणार आहे. रेल्वेसेवा निरंतर सुरू राहण्यास या पुलामुळे मदत होणार आहे. २०१६ पासून या कामाला गती मिळाली असून विविध विभाग यात सहभागी होते. या पुलामुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरची वाहतूक शक्य होणार आहे. लोकल आणि एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने लोकलचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. ठाणे आणि कल्याण दरम्यान त्यामुळे शटल सेवा सुरू करण्यास मदत होणार आहे. रेल्वे रूळांवरची मानवी हस्तक्षेपाचे मार्ग बंद झाल्याने त्याचा फायदा रेल्वे प्रवासाला होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -