Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरवसई कोळी वाड्यात धोकादायक विकासकाम सुरु!

वसई कोळी वाड्यात धोकादायक विकासकाम सुरु!

१५ लाखाच्या कामाची होणार माती, पालिकेच्या विकास कामामुळे इमारती कोसळण्याची शक्यता

विरार (प्रतिनिधी) : वसई ‘आय’ प्रभागमधील कोळीवाडा येथील पालिकेच्या भूमिगत गटाराचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु आहे. याबरोबरच करण्यात आलेले खोदकाम लगतच्या इमारतीसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. असे असतानाही पालिकेचे अभियंता प्रकाश साटम ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

वसई कोळीवाडा येथील मुख्य रस्ता खोदुन पालिकेने मोठ्या गटाराचे बांधकाम सुरू केले आहे. यासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कंत्राटदाराने कुठलीच नियमावली न पाळता खोदकाम केले. बांधकाम करताना पीसीसी वरती ६ इंच कोटिंग करणे गरजेचे असताना ती करण्यात आलेली नाही. पालिका अभियंता, अधिकारी जागेवर नसताना हे बांधकाम घाईने करण्याकडे कंत्राटदाराचा कल आहे. याकरता रात्री बांधकाम उरकण्यात येत आहे. या बांधकामा लगत जीर्ण झालेल्या, लोड बेरिंग असलेल्या इमारती आहेत. त्यांच सर्वेक्षण न करताच भलमोठे खोदकाम केल्याने नजिकच्या इमारतीना तडे पडायला सुरुवात झाली आहे.

दुर्दैवाने सदर इमारती कोसळल्या व त्यात जीवित, वित्तहानी झाली तर पालिका प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर काम तत्काळ थांबवून पंचनामा करणे गरजेचे आहे. शिवाय गरज भासल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

आय प्रभागचे अभियंता प्रकाश साटम यांना याची विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता २ दिवसांपासून फोन नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अशा अधिकारी वर्गामुळे करदात्या नागरिकांचे पैसे अशा विकास कामामुळे वाया जाणार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवाय नागरिकांचे जीव धोक्यात असतानाही उपाययोजना केली जात नाही. याबाबत पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र लाड यांना याबाबत कल्पना दिली असता, त्यांनी सदर विकास कामाची पहाणी करून दोषी विरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -