Tuesday, April 23, 2024

शापित

प्रियानी पाटील

तिच्या जीवनाला शाप लागला आहे, असे सारेच म्हणायचे. कारण चंद्रकोरीप्रमाणे तिचा चेहरा कोर उजळावी इतकाच तेजाळलेला होता. बाकी चेहऱ्याला शाप लागावा इतका तो काळा ठिक्कर. तिला पाहणारे घाबरून जायचे, रात्रीच्या काळोखात चंद्रकोर म्हणून तिचा तेजाळणारा चेहरा कधी कुणी पाहिला किंवा सकाळी सकाळीच कुणी पाहिला, तर त्या दिवसाचा बट्ट्याबोळ झालाच असे जो तो समजायचा.

ही चंद्रकोर कुणाच्या आयुष्याचं भलं करणार नाही. ही सकाळी उठून अशी गावभर भटकते की, सगळ्याना हिचं तोंड पाहावं लागतं आणि सगळ्यांच्याच कामात खोडा निर्माण होतो, अनेकजण असं बोलायचे. तिलाही हे असं रोज रोज ऐकण्याची सवयच होऊन बसली होती.

एका दुकानात लटकवून ठेवलेल्या आरशाची गोलाई एकदा तिच्या नजरेत भरली. तो आरसा ती बराच वेळ निरखत राहिली. तिला वाटला हा आरसा आपल्याकडेही असावा, पण पैसे? कारण आरसा फारच महाग असावा, हे तिने जाणलं. आपल्या बटव्यात तेवढे पैसे नाहीत हे समजून आरशाकडे पाहत पाहत आपला चेहरा निरखत निरखत ती चालू लागली आणि तोल जाऊन अडखळली, तसे आजूबाजूला हास्याचे फवारे उडाले…

तिने इकडे तिकडे पाहिलं तेव्हा, “आरशात तोंड पाहण्यासारखं आहे तरी का तुझं” हे शब्द जसे कानावर आदळले, तशी ती सावरली. उठली आणि या साऱ्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा आरशाकडे बघत बघत चालू लागली.

कुणी एक पुढे आला. म्हणाला, “तुला आरसा हवा का? मी घेऊन देतो.” दुसरा पुढे आला, “चंद्रकोर आहेस तू. पण तुला याचा अंदाज नाही. मी घेऊन देतो तुला आरसा.” दोघा-तिघांनी तिला छेडले. आणि ते सारे त्या आरशाच्या दुकानात गेले. तिची नजर त्या आरशावरच खिळलेली, ती तोच आरसा पाहत राहिली आणि दुकानात गेलेले दोघे-तिघे तीन-चार प्रकारचे आरसे घेऊन तिच्यासमोर येऊन उभे ठाकले. तिने हे सारं पाहिलं आणि ती खदाखदा हसू लागली. तिचं हसू आवरेना. तिचं हसणं बघून ते सारे गोंधळले. त्यांनी जाणलं तिला हवा असलेला आरसा आपण खरेदी करू शकत नाही, कारण ती ज्या आरशाकडे टक लावून राहिलीय, तो आरसा तर फारच महाग आहे, जो आपल्या खिशाला परवडणारा नाही. पण तरीही ज्याने त्याने आपण आणलेला आरसा तिच्यासमोर धरला आणि म्हटलं, “तसाही तुला आरसा हवाय कशाला गं? शापित आहेस शापित तू.” एकाचं सांगणं.

“तुझं तोंड कुणी पाहिलं, तर सारा दिवस खराब होऊन जातो पाहणाऱ्याचा, तुला कशाला हवाय आरसा?” दुसरा बोलला “आम्ही आणलेले आरसे घे, आणि आरशात तोंड बघत बस, मग तुला गावभर भटकण्याची गरज पडणार नाही. सारं गाव घाबरतं तुला. तुझा हा ग्रहण लागल्यागत चेहरा बघून लोकांना रोजचंच ग्रहण असल्याचा भास होऊ जातो, अगं शापित म्हणजे काय याचा उलगडा तुझ्याकडेच पाहिल्यानंतर होतो.” तिसरा बोलला. तशी ती चवताळली म्हणाली, “मी शापित नाही.”

तिची नजर पुन्हा त्या आरशावरच खिळली. या साऱ्यांनी जाणलं, हीचं आपल्याकडे लक्षच नाहीये. आपण आणलेल्या आरशाकडे ही पाहत देखील नाहीये. तिची नजर त्याच आरशाकडे लागलीय जो आपल्या तिघांच्याही आवाक्याबाहेरचा आहे. आता त्या तिघांची नजर त्या आरशाकडे लागली, ज्याकडे ती बराच वेळी तहान-भूक हरपून पाहत राहिलेली. त्यांचीही नजर आता त्या आरशावरच खिळून राहिली. मात्र बघता बघता तो आरसा असा काही या साऱ्यांच्या पुढ्यात खळकन फुटला की, काचा इतस्ततः पसरल्या.

काय झालं इतक्या जलद की, तिला काहीच कळलं नाही, पण जे काही घडलं ते क्षणार्धात घडलं. आरसा कसा फुटला, का फुटला, कुणी फोडला काही कळलं नाही. मात्र क्षणार्धातच फुटलेला हा किमती आरसा अशा तऱ्हेने फुटलेला पाहून त्या तिघांची पावलं आपसूकच मागे फिरली. तसा दुकानदार बाहेर आला. “आरसा कसा फुटला, कोणी फोडला?” त्याने साऱ्यांना दटावून विचारलं.

तसा एक म्हणाला, “आरसा कोणीही जाणूनबुजून फोडला नाही, स्वतःहूनच फुटला.” “स्वतःहून कसा फुटेल?” दुकानदार त्या फुटलेल्या आरशाकडे पाहू लागला. तसा दुसरा म्हणाला, “फुटेल नाही तर काय, ही चंद्रकोर केव्हाची टक लावून बसलेली होती त्या आरशाकडे. त्या आरशाला हिचं सौंदर्य सहन झालं नसावं, शापित कुठची, बघ तो आरसा पण फुटला तुझं तोंड बघून…”

दुसरा म्हणाला तसा तो दुकानदारही चवताळला. “ए बाई, चालती हो इथून आणि पुन्हा येथे फिरकूही नकोस. तू चंद्रकोर असलीस तरी बाकी ग्रहण लागलंय तुझ्या तोंडाला आपलं तोंड घेऊन इथे फिरकूही नकोस. मोठं नुकसान झालं माझं तुझ्यापायी… सोन्यासारखा किमती आरसा फुटला माझा.” दुकानदार रागाने तिच्याकडे पाहून पुटपुटला. तसे ते तिघेही खदाखदा हसत सुटले.

पण तिचे डोळे मात्र भरून आले. तिने न्याहाळलं आपलं सौंदर्य त्या इतस्ततः पसरलेल्या काचांमध्ये चंद्रकोर म्हणून उमललेला तिचा चेहरा किती देखणा होता. पण उर्वरीत चेहऱ्याला लागलेला काळेपणाचा डाग हा मात्र कधीही न मिटणारा होता. अगदी चेहऱ्यावरचाही आणि माणसांच्या मनात तिच्याबद्दल निर्माण झालेल्या मतमतांतराचाही. कारण एकदा बसलेला शापितपणाचा ठपका आता आयुष्यभर तिला असाच झेलावा लागणार होता. हे तिने जाणलं आणि फुटलेल्या काचांवरून तिची पावलं अनेक वेदनांचा ठाव घेत आपसूकच चालत राहिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -