Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजCrime : नातवांच्या हक्कासाठी लढते आजी...

Crime : नातवांच्या हक्कासाठी लढते आजी…

माणूस जन्माला येतो आणि मृत्यूही पावतो. (Crime) पण धनदौलत, संपत्ती स्थावर मालमत्ता, जंगल मालमत्ता यासाठी आयुष्यभर लढतो आणि स्वतःच्या रक्ताशी स्वतःच वैरी होतो.

रमा यांना दोन मुली, मुलगा नाही. दोन्ही मुलींना त्याने चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन लहानाचं मोठं केलं. योग्य वयामध्ये त्या दोन्ही मुलींची लग्न करून आपापल्या सासरी पाठवलं. मोठी गीता व छोटी शामा दोघी आपापल्या घरी अगदी सुखात होते. शामाला दोन मुलगे झाले. रमाला फार आनंद झाला. आपल्याला मुलगा नाही, पण आपल्या मुलींना झाला. याचा आनंद तिला पुष्कळसा होता. पण आनंद चिरकाल टिकत नाही ना, तेच खरं. शामाचा नवरा अॅक्सिडेंटमध्ये गेला. बिचाऱ्या शामावर फार मोठं संकट कोसळलं. तरुण वयात शामा विधवा झाली. दोन मुलं गाठीशी, घरामध्ये एक दीर आणि त्याची फॅमिली होती. शामाच्या आईने आपल्या तरुण विधवा मुलीला आपल्या घरी आणायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिने केलं. शामा आणि तिची आई रमा त्या दोन मुलांना वाढवू लागल्या आणि शिक्षण देऊ लागल्या. दिवस निघू लागले आणि अचानक शामाला कॅन्सरचं निदान झालं. शामासकट अख्ख कुटुंब हादरलं. वडिलांचं छत्र मुलावर नव्हतं आणि आता आईचे छत्र हरपणार, या गोष्टीने रमा सर्वात हादरली. आपलं वय झालेलं होतं आणि मुलांना मोठं करायचं होतं, हा मोठा प्रश्न तिच्या समोर आ वासून उभा राहिला. मुलीच्या उपचारासाठी पैसा लागू लागला. भरपूर पैसा रमाने आपल्या मुलीसाठी लावला. मुलीला अजून पैसा लागणार होता म्हणून रमाने शामाचा लहान दीर सुधीर याला विनवणी केली की, शामाच्या उपचारासाठी काही पैशांची मदत कर.

सुधीरने थोडा विचार केला आणि पैसे परत करणार या गोष्टीवर तयार होऊन बोर्ड पेपरवर तसं लिहून घेत रमाला साडेतीन लाख रुपये शामाच्या उपचारासाठी दिले. कॅन्सर असल्यामुळे शामा काही दिवसात मुलांना आणि आईला सोडून निघून गेली. बिचारी लहान मुलं परत अनाथ झाली. रमा आपल्या उतारवयामध्ये त्या मुलांना मोठं करू लागली शिक्षण देऊ लागली. त्याच वेळी सुधीर याने मुंबईतील राहात असलेली जागा जी त्या काळामध्ये चाळ पद्धत होती. आणि त्या चाळीवर शामाच्या सासऱ्यांचा मालकी हक्क होता. ती सुधीरने एका बिल्डरला दहा करोडसाठी डेव्हलपिंगसाठी विकली. याची खबर रमाला लागली आणि तिने सुधीरची भेट घेतली आणि आपल्या नातवंडांच्या हिशोबाबद्दल विचारणा केली. सुधीरने सरळ सांगितलं की, ‘तुम्हाला मी साडेतीन लाख रुपये दिलेले होते, तेव्हा तुमचा हिस्सा संपला.’ साडेतीन लाख रुपये कुठे आणि दहा करोड रुपये कुठे, याचा काही ताळमेळ बसत नव्हता. म्हणजे एका भावाला दहा करोड आणि एका मृत भावाच्या वारसांना साडेतीन लाख. रमाने आपल्या जावयाच्या नावावर असलेली काही कागदपत्र गोळा केली. आपली मुलगी त्या घराची सून होती, हे दाखवणारी कागदपत्रं गोळा केली व आपली नातवंडं त्या घराची वारस आहेत, याची कागदपत्र गोळा केली आणि हे सर्व करून तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

सुधीर आणि डेव्हलपर यांच्याविरुद्ध तिने न्यायालयात केस दाखल केली की, त्या मालमत्तेचा एकटा सुधीरच वारसदार नसून त्याच्या मृत भावाची मूलंही वारसदार आहेत. त्यांना जाणीवपूर्वक मालमत्तेतून डावल जात आहे. त्यांच्या हक्कापासून त्यांना दूर ठेवून त्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. यासाठी या उतारवयात जमत नसतानाही रमा हातात काठी घेऊन नातवंडासाठी न्यायालयात लढा लढत आहे.

सुधीर न्यायालयात मी साडेतीन लाख रुपये दिले. त्यांचा हिस्सा दिला, असं तो कोर्टात साबित करत आहे. तीच मालमत्ता दहा करोडला विकली. हे दहा करोड स्वतः मिळवायचे आणि मृत भावांच्या मुलाला वाऱ्यावर सोडायचे, हा त्याचा मोठा डाव एकटी रमा उधळून लावण्यासाठी लढत आहे. मृत मुलीला व जावयाला न्याय मिळवून देण्यासाठी नातवंडांना सोबत घेऊन लढणारी आजी आज न्यायालय बघत आहे.

(सत्य घटनेवर आधारित)

-अॅड. रिया करंजकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -