Tuesday, April 16, 2024

कोविड-१९

प्रा. प्रतिभा सराफ

‘कोविड-१९’ असे जरी या आजाराचे नाव असेल तरी तो अजून भारतातून तरी गेलेला नाही, हे मी नक्की सांगू शकते कारण या आजाराने चक्क माझ्यावरच घाला घातला तो ऑगस्ट २०२२ मध्ये!

मग काय तीन दिवस माणसात नव्हते. अन्नाचा कण पोटात जाईना. रात्र कळत नव्हती… दिवस कळत नव्हता. शरीराचे तापमान १०३° ते १०४° च्या वर तर ऑक्सिजनची पातळी ९२-९३ च्या आसपास! डॉक्टर म्हणाले, ‘ॲडमिट करावे लागेल!’ मी ठाम ‘नाही’ म्हटले. अलीकडेच एकदा धाडकन चक्कर येऊन साष्टांग नमस्कार घातला होता. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते, तर सलाईनमधून नेमकं काय घालतात माहीत नाही. माणूस बरा होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस आजारीच होत जातो. म्हणजे कोणीही वाईट अर्थाने घेऊ नका. केवळ गंमत! इथे मला कोणत्या डॉक्टरला किंवा हॉस्पिटलला दोष द्यायचा नाही. माणसाची मानसिकता! कदाचित त्या हॉस्पिटलचे वातावरण पाहून आपण घाबरून अधिकाधिक आजारी होत असू किंवा इतक्या साऱ्या औषधं-गोळ्यांची सवय नसल्यामुळे कदाचित जास्त थकवा येत असेल. काहीही असो… मी ठाम नकार दिला याचे कारण youtube, शॉट व्हीडिओज, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि आपल्याला शहाणे करणारे सगळे सोर्सेस! ऑक्सिजन वाढण्यासाठी पोटावर झोपायचे, घरात तुळशी वृंदावनाचे रोप आणून ठेवायचे, अनुलोम-विलोम करायचे… ही यादी न संपणारी आहे. पण आतापर्यंत फक्त पाहत – ऐकत होतो त्याला अनुभवायची पहिल्यांदा संधी मिळत होती, मग ती कोण सोडणार? सगळे प्रयोग केले. ऑक्सिजन हळूहळू ९४ वर आले आणि माझ्याइतकाच आनंद डॉक्टरांना झाला. असो.

‘कोविड’ नाहीच ही केवळ लबाडी, असे कुठेतरी काल-परवापर्यंत वाटत होते त्याला ठोकर लागली. जीव नकोसा होणे, जीव जाता जाता वरून खाली येणे, हे सगळे अनुभवता आले. शेजारून खजूर – शेंगदाणे – तीळ लाडू आले, मैत्रिणीने गावच्या मधाची बाटली आणून दिली, मित्राने बाजारातून डिंकाचे लाडू आणून दिले ही यादी सुद्धा न संपणारी आहे.

फोनवर ‘काळजी घे’, ‘आम्ही सोबत आहोत.’, ‘काही लागले तर हक्काने सांगायचे.’ या सगळ्या फोन बरोबर, रात्री-मध्यरात्री सुद्धा फोन करायला हरकत नाही. ‘जर ऑक्सिजनची पातळी खाली गेली किंवा शरीराचे तापमान वाढले!’ हा फॅमिली डॉक्टरचा दिलासा देणारा फोन! खूप साऱ्या ब्लड टेस्ट, आयुष्यात पहिल्यांदाच केलेली DDIMER टेस्ट, आठवडाभरात तीन वेळा रिपीट केली. आपल्याला त्यातलं काय कळतंय म्हणा? पण तिसऱ्या दिवशी डॉक्टरांचा ‘Better’ असा एसएमएस आला आणि मी मोकळा
श्वास घेतला.

‘नको त्या कार्यक्रमाला घेतली असशील!’, ‘एसी हॉलमध्ये बसली होतीस का?’, ‘काचा बंद असलेल्या उबर किंवा ओला टॅक्सीने गेली होतीस का? तुझ्या आधी एखादा पेशंट गेला असेल!’, ‘त्या गजबजलेल्या मार्केटमध्ये गेली होतीस का?’, ‘बाहेर जाऊन आल्यावर वाफारा घेत नव्हतीस का?’, ‘व्हिटामिन – सीच्या गोळ्या का बंद केल्या. अजून कोविड गेलेला नाही!’, ‘कोण येऊन गेले होते घरी?’ दिवसातून पाच वेळा चहा पिताना आणि दहा वेळा वाफारा घेताना हजार प्रश्नांना बेजार करणारे अतिजवळचे लोक! ‘काळजीवाहू सरकार!’ असे मुलीला हात जोडून म्हटले. ‘म्हणजे काय?’ असे तिने गोड हसून विचारले. लिहिण्यासारखे खूप आहे पण इतकेच, कोणत्याही माणसाने कोणत्याही आजाराची कितीही ‘खिल्ली’ उडवली तरी त्या आजाराने ठरवले तर त्या माणसाची ‘बोल्ती’ मात्र तो बंद करू शकतो, एवढं मात्र खरं!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -