Friday, March 29, 2024
Homeदेशराष्ट्रीय सुरक्षा भक्कम करण्यासाठी नागरी लष्करी समन्वय आवश्यक : राजनाथ सिंह

राष्ट्रीय सुरक्षा भक्कम करण्यासाठी नागरी लष्करी समन्वय आवश्यक : राजनाथ सिंह

मसुरी (हिं.स) :राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी तसेच बदलत्या जागतिक परिस्थितीतून निर्माण होणारी भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी नागरी प्रशासन आणि सशस्त्र दलात अधिक समन्वय हवा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. उत्तराखंड मध्ये मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (एलबीएसएनएए) मध्ये 28 व्या संयुक्त नागरी लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींना संबोधित करताना बोलत होते. लष्करी हल्ल्यांपासून संरक्षण या सर्वसामान्य संकल्पनेला अनेक बिगर-लष्करी आयाम जोडले गेल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अधिक व्यापक झाल्याचे संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

राजनाथ सिंह यांनी रशिया-युक्रेन परिस्थिती आणि त्यासारख्या अन्य संघर्षांचे उदाहरण देऊन जग पारंपरिक युद्धा पलीकडची आव्हाने पाहत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “शांततेच्या काळात देखील विविध आघाड्यांवर युद्ध सुरुच राहते. पूर्णपणे चालणारे युद्ध एखाद्या देशासाठी तेवढेच घातक असते, जेवढे ते त्याच्या शत्रूसाठी असते. त्यामुळे, गेल्या काही दशकांमध्ये व्यापक स्तरावरील युद्ध टाळली गेली. त्याची जागा छुप्या युद्धांनी घेतली आहे.

तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, माहिती, उर्जा, व्यापार प्रणाली, अर्थ प्रणाली ही आता शस्त्र झाली असून आगामी काळात याचा प्रयोग आपल्या विरोधात होऊ शकतो. सुरक्षेच्या या व्यापक आव्हानांना तोंड देण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे,” संरक्षण मंत्री म्हणाले, या आव्हानांवर मात करण्यासाठी ‘संपूर्ण राष्ट्र’ आणि ‘संपूर्ण सरकार’ हा दृष्टीकोन आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.”

ते म्हणाले की सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी तसेच संरक्षण क्षेत्राला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी उचललेल्या पावलांचे परिणाम दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेच्या अनुषंगाने भारत आता केवळ स्वतःच्या सशस्त्र दलासाठी उपकरणांचे उत्पादन करत नाही, तर मित्र राष्ट्रांची गरज देखील भागवत असल्याचे ते म्हणाले.

मिश्र धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी जोपर्यंत नागरी प्रशासन आणि सशस्त्र दल यामधले स्वतंत्र कप्पे नष्ट होत नाही, तोपर्यंत देशाची भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक तयारीची अपेक्षा राहू शकत नाही, हा आपला दृष्टीकोन राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केला. तथापि, त्यांनी हे सांगितलं की समन्वय याचा अर्थ एकमेकांच्या स्वायत्ततेचे उल्लंघन करणे नाही; तर इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे एखाद्याच्या स्वतंत्र ओळखीचा आदर राखून एकत्र काम करणे, हा आहे.

“भारत हे शांतता प्रिय राष्ट्र असून त्याला युद्ध नको आहे. त्याने कधीच एखाद्या देशावर हल्ला केला नाही, किंवा कोणाची एक इंच भूमी देखील काबीज केली नाही. मात्र, आमच्यावर कोणी वक्र दृष्टी टाकली, तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ,” असे संरक्षण मंत्री म्हणाले. राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली, ज्यांनी देशाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -