Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसेनेच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला मिळणार फायदा

सेनेच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला मिळणार फायदा

अतुल जाधव

ठाणे : आरक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर शहरात महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुका लांबल्यानंतर ठाणे शहरात सुरू असलेल्या आयाराम गयाराम नाट्याला खीळ बसली होती; परंतु आता पुन्हा या नाट्याला सुरुवात होणार असे चित्र आहे. ठाण्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना फुटल्यामुळे ठाण्यात भाजप एकाकी पडली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरात आपली ताकद वाढवण्यासाठी पत्ते टाकण्यास सुरुवात केली असून शिवसेना पक्षात असलेल्या नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत असून शिवसेना पक्षातील नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना भाजपकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपखाडी भागातील सेनेच्या नाराज शिलेदारांना हेरून त्यांना पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून गळ घातली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

याशिवाय प्रभागात प्राबल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून संपर्क साधला जात असल्याचेही वृत्त आहे. यानिमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शहरात मिशन कमळ राबविण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली असून त्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नाराज शिलेदारांवर भाजपचा डोळा असल्याचे सूत्रांकडून समजते.

कुरघोडीचे राजकारण सुरू…

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण प्रक्रिया नुकतीच उरकण्यात आली असून पावसाळ्यानंतर पालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र काही महिन्यांपूर्वी शहरात होते.

इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक प्रभागात नाराजीच्या नाट्याचा खेळ रंगणार आहे. त्रीसदस्य प्रभाग रचना असल्याने विद्यमान नगरसेवकांना संधी द्यायची की मतदारांसमोर नवीन चेहरा द्यायचा?
हा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागांची रचना मोठ्यप्रमाणावर बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह माजी तसेच इच्छुक उमेदवारांसमोर उमेदवारी मिळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -