Friday, April 19, 2024
Homeमहामुंबईराज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली

पाचजणांवर सोपविली विशेष मोहीम

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून ही निवडणूक भाजप व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जोडीला आणखी तीन आमदारांची रसद दिली असून रणनिती यशस्वी करण्यासाठी भाजपने पाचजणांवर विशेष मोहीम सोपविली आहे.

या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये आणि भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपच्या वतीने भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे आमदारांची जबाबदारी देण्यात येणार आहे. नेमकी ही जबाबदारी काय असेल आणि त्यात कोण कोण आहेत याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली असून त्याची विरोधकांना कल्पना येऊ नये यासाठी विशेष गोपनीयताही बाळगण्यात येत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मैदानात दिला आणि आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत तीनही उमेदवार विजयी करण्यासाठी भाजपला १४ मतांची गरज आहे. ही मते मिळविण्याची जबाबदारी भाजपने दिग्गज नेत्यांवर दिली आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजपने ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्रिमूर्तींवर विशेष जबाबदारी दिली आहे. गिरीश महाजन, आशीष शेलार, प्रसाद लाड या तीनजणांचा रणनिती अभियानामध्ये फडणवीस व पाटील यांच्यासह सहभाग करून घेतला आहे. अपक्ष आणि मित्रपक्षांच्या मदतीने भाजपचे संख्याबळ ११२ आहे.

भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊन भाजपकडे २८ मते राहतात तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपला १४ मतांची गरज आहे. ती जुळवणे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. भाजप सत्तेत असताना गिरीश महाजन यांची संकटमोचक म्हणून ओळख होती. आता हाच पत्ता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने वापरायचा ठरवला आहे, तर गेल्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत आशीष शेलार यांनी चमकदार कामगिरी केली होती. आता त्यांना राज्यसभेची मोहीम दिली आहे, तर निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे. आता हे त्रिमूर्ती भाजपला विजय मिळवून देतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -