Thursday, April 18, 2024
Homeताज्या घडामोडीपाणी योजनेच्या मुदतवाढीवरून भाजप आक्रमक

पाणी योजनेच्या मुदतवाढीवरून भाजप आक्रमक

...तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होणार

रत्नागिरी :पालिकेच्या शेवटच्या विशेष सभेत शहरातील नळपाणी योजनेच्या कामाला मुदतवाढ देण्यावरून भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुदतवाढ दिली तरीही काम पूर्ण होण्याची शाश्वती ठेकेदार देणार का? असा प्रश्नही उपस्थित केला. विरोधकांनी मांडलेले आक्षेप मान्य करत नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी अटी-शर्थी घालून मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. तसेच त्या मुदतीत काम झाले नाही, तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी, असाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

रत्नागिरी पालिकेची विशेष सभा प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शनला मुदतवाढ देण्यावरून भाजप नगरसेवक गटनेते समीर तिवरेकर, राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, सुप्रिया रसाळ यांच्यासह अपक्ष नगरसेवक विकास पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. नळपाणी योजनेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्यांची कामे होणार नाहीत. शहरातील काही भागांमध्ये अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत. अन्वी कन्स्ट्रक्शनकडून कामे करण्यासाठी पुरेसे कामगार दिले जात नाहीत. नगरसेवकांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील.

मुदत वाढवून दिल्याच्या कालावधीत ठेकेदार काम पूर्ण करेलच याची जबाबदारी कोण घेणार आहे. दिड वर्षांपूर्वी काम सुरू होण्यास आठ महिन्यांचा उशिर झाल्यानंतर ठेकेदाराने पालिकेकडून अतिरिक्त निधी मागून घेतला. आता तीन ते चार वेळा मुदत देऊनही ठेकेदार दिरंगाई करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तिवरेकर यांनी केली. तर तोडणकर म्हणाले, काम पूर्ण झालेल्या भागातील पाईपलाईन फुटून पाणी बाहेर पडत आहे. त्यासाठी रस्ता खोदावा लागतोय. एस.टी. बसस्थानकाच्या खालील काही भागात ही परिस्थिती उद्भवत आहे. याला ठेकेदार जबाबदार नाही का? आक्रमक झालेल्या सदस्यांना शांत करत नगराध्यक्षांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून त्याच्याकडून काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घ्यावे अशी सुचना मुख्याधिकाऱ्यांना केली.

नगराध्यक्ष साळवी म्हणाले की, आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. २,८०३ अतिरिक्त जोडण्या द्यावा लागत आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी वेळ लागणार आहे. ठेकेदाराकडून काम करवून घेण्यासाठी पालिकेला संयम बाळगावा लागत आहे. योजना शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला अटी-शर्थी घालूनच ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ द्या.

मुरुगवाड्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण ठरावावरून सत्ताधारी शिवसेनेला भाजप नगरसेवकांनी धारेवर धरले. भाजप गटनेते तिवरेकर म्हणाले, हा रस्ता माझ्या प्रभागातून जात असतानाही याबाबत नगरपालिकेकडून विचारणा झालेली नाही. आम्ही दिलेल्या रस्त्यांची कामे मंजूर होत नाहीत. याकडे नगराध्यक्ष लक्ष देणार का? आम्ही शिवसेनेच्या प्रभागातील एखादे काम सुचवले तर तो तुमचा प्रभाग नाही असे सांगितले जाते. जसे मुरुगवाड्यातील रस्त्याचे काम प्राधान्याने करायला घेतली जातात, तशी आमचीही कामे झाली पाहिजेत, असे ठणकावले. यावर नगराध्यक्ष साळवी यांनी तिवरेकर यांनी सुचवलेल्या रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे सांगत यावर तोडगा काढला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -