Thursday, April 25, 2024
Homeमहत्वाची बातमीचाळीस रुपयांची वस्तू पन्नासला दिली, बिग बझारला ३५ हजार रुपयांचा दंड

चाळीस रुपयांची वस्तू पन्नासला दिली, बिग बझारला ३५ हजार रुपयांचा दंड

सोलापूर (हिं.स.) – चाळीस रुपयांच्या वस्तूसाठी बिग बाजार शॉपिंग मॉलने पन्नास रुपये आकारणी केली. तक्रारदाराने ग्राहक मंचात धाव घेतल्यानंतर बिग बझारला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतचा आदेश आयोगाचे अध्यक्ष ए. एस. भैसाने, सदस्य बबिता महंत-गाजरे, सचिन पाठक यांनी दिला.

तक्रारदार सहायक पोलिस निरीक्षक योगेश वेळापुरे हे सोलापूर येथे शासकीय नोकरीत आहेत. त्यांनी सात रस्ता सोलापूर येथील बिग बाजार या शॉपिंग मॉलमध्ये २० ऑगस्ट २०२० रोजी फेविस्टिकचे दोन नग खरेदी करण्यासाठी गेले होते. एका नगाची छापील किंमत वीस रुपये असताना २ नगाचे बिग बाजारकडून ५० रुपये आकारण्यात आले. ते मूळ किमतीपेक्षा दहा रुपये जास्तीचे होते. बिल दाखवून त्यांनी बिग बाजारच्या काऊंटरवर विचारणा केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठवण्यात आले.

वेळापुरे यांनी १९ मार्च २०२० रोजी आयोगासमोर तक्रार दाखल केली. यावेळी बिग बाजारच्या वतीने आरोपाचे खंडन करीत खोटा व बिनबुडाचा अर्ज असल्याचे सांगण्यात आले होते. सर्व कागदपत्रे व युक्तिवाद ऐकून घेऊन अखेर आयोगाच्या वतीने बिग बाजारला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तक्रारदार हे शिक्षित व नोकरीत असल्याने सदर बाबींचा मानसिक त्रास व त्याचे निरसन करण्यासाठी वेळ व पैसा सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ते यांना मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये विरोधी पक्षाने दहा हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. पंचवीस हजार रुपये ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराच्या वतीने करमाळ्याचे विधिज्ञ संजय ढेरे यांनी काम पाहिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -