Wednesday, April 24, 2024
Homeदेशद्रौपदी मुर्मू यांना रबर स्टॅम्प म्हणणाऱ्यांना भारती पवारांनी सुनावले

द्रौपदी मुर्मू यांना रबर स्टॅम्प म्हणणाऱ्यांना भारती पवारांनी सुनावले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या विक्रमी मतांनी जिंकल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनणार असून, त्या पहिल्या आदिवासी-महिला राष्ट्रपती ठरतील. दरम्यान उमेदवारीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर टीका करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘आता ते दिवस गेले असून विरोधकांनी जुन्या मानसिकतेतून बाहेर पडावे’, अशा शब्दात त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना रबर स्टॅम्प म्हणणाऱ्यांना सुनावले आहे.

‘हा ऐतिहासिक निर्णय असून, सोनेरी क्षण आहे. आदिवासी समाजातील आमची माता राष्ट्रपती होईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आमच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. त्यांच्या विजयाचा क्षण हा आदिवासी समाजाची मुलगी म्हणून आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. आम्ही सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहोत याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतल्याने मी त्यांची आभारी आहे,’ असे भारती पवार यांनी सांगितले.

द्रौपदी मुर्मू यांना अधिक मते मिळायला हवी होती का? असा प्रश्न विचारण्यात असता त्यांनी सांगितले की ‘आणखी मते मिळतील अशी आशा होती. विरोधक राजकारण बाजूला ठेवून आदिवासी समाजाला प्राधान्य देतील असे वाटले होते. पण दुर्दैवाने त्याला राजकीय रंग देण्यात आला. फक्त भाषणांमध्ये आदिवासी समाजाला पुढे आणले पाहिजे सांगायचे, पण मतदानात राजकारण आडवे येते हे आदिवासी समाज पाहत आहे. हा राजकीय आखाडा नसतानाही तिथे आम्हाला संघर्ष करावा लागत आहे’. ‘ज्यांना आवाज नाही त्यांची का निवड होत आहे?’, अशी विचारणा तेजस्वी यादव यांनी केली होती. त्यासंबंधी बोलताना भारती पवार म्हणाल्या की, ‘या वक्तव्यावर माझा आक्षेप आहे. तुम्ही द्रौपदी मुर्मू यांचा इतिहासच वाचलेला नाही. भारतमाता आणि समाजसेवेसाठी त्या किती समर्पित आहेत हा इतिहासच वाचला नसेल तर तुमचे वक्तव्य दुर्दैवी आहे.

विनावेतन त्यांनी शिक्षणाचे काम सुरु केले होते. माझा वेळ मुलांच्या शिक्षणासाठी दिला तर पुढील पिढीला सक्षम करता येईल असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे रबर स्टॅम्प वैगैरे या संकल्पना आता गेल्या आहेत, आता ते दिवस गेले आहेत’. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीतच मुर्मू यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा जादुई आकडा गाठला. मुर्मू यांना ६४.०३ टक्के, तर सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली. द्रौपदी मुर्म यांनी ६,७६,८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारड्यात केवळ ३,८०,१७७ इतके मतमूल्य जमा झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -