अलिबाग (वार्ताहर) : बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी (water taxi) लाँचसेवा शनिवार २६ नोव्हेंबरपासून सुरु होत असल्याने अलिबागकरांना आता नवी मुंबईला केवळ सव्वा तासात पोहचता येणार आहे. यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा सुरुवातीला केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.

नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. ही वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालविण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला असून, ही सेवा बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. बेलापूर ते गेटवे ऑफ दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे सागरी मंडळाने बेलापूर ते मांडवा मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवार, २६ नोव्हेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बेलापूर जेट्टी येथून सकाळी आठ वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहोचेल. तर संध्याकाळी सहा वाजता मांडव्यावरून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहोचेल. सध्या नवी मुंबईतून अलिबागला पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर – मांडवा अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे. या सेवेसाठीच्या ऑनलाइन बुकिंगला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here