Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणजनतेच्या मनातील नगरसेवक बना

जनतेच्या मनातील नगरसेवक बना

देवगड येथील उमेदवार बैठकीत नारायण राणे यांचे मार्गदर्शन

देवगड (प्रतिनिधी) : चांगले काम व कार्य करून जनतेच्या मनातील नगरसेवक बना. नगरसेवक या पदात सेवक हा शब्द आहे. जनतेची सेवा करण्याचे काम नगरसेवक करतात, असे मत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

नारायण राणे यांनी देवगड येथे देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी निवडणूक लढवत असलेले उमेदवार व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. जामसंडे येथील भाजप कार्यालयामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, देवगडचे निरीक्षक व कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, देवगडच्या नगराध्यक्षा प्रियंका साळसकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, अमोल तेली व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, मी आज देवगडच्या गार्डनमध्ये गेलो, मला अभिमान वाटला. देवगडसारख्या शहरांमध्ये एवढे चांगले गार्डन आमच्या नगरपंचायतीने बांधले. नगरपंचायतीने क्रीडांगण गार्डन यासारख्या सुविधा दिल्या पाहिजेत. हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे. ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी नाराज न होता काम करा. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या योजना राबवतात, त्यांचे स्वतंत्र प्रसिद्धीपत्रक करून लोकांना वाटा आपल्या योजना लोकांना कळू दे, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली. नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. यामध्ये कोरोना काळात आपत्तीवेळी जनतेला वाचवू शकले नाहीत, ते तुमचा विकास काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात कोरोनाने एक लाख नागरिकांचा मृत्यू झाला. ही संख्या देशात सर्वात जास्त आहे, अशा प्रकारचे काम करणारे सरकार विकास करू शकत नाही, असे नारायण राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -