Thursday, April 25, 2024
Homeकोकणरायगडउरणच्या पश्चिम समुद्रात सापडल्या पुरातन पाषाण मूर्ती!

उरणच्या पश्चिम समुद्रात सापडल्या पुरातन पाषाण मूर्ती!

उरण (वार्ताहर) : उरण येथील समुद्रात काही पर्यटकांना पुरातन काळातील पाषाणात कोरलेल्या मूर्ती सापडल्या आहेत. सदर मूर्ती नक्की कोणत्या काळातील आहे, याबाबत अज्ञभिनता आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या अहवालानंतर सदर मूर्तींबाबत योग्य ती माहिती मिळेल, अशी माहिती शिवराज प्रतिष्ठान यांनी दिली.

उरण हे बेट असून या बेटावर अनेक पुरातनकालीन वस्तू असल्याचे सांगण्यात येत आहेत. ज्याचा शोध घेणे आवश्यक आहे. उरणच्या पश्चिम किनारासुद्धा या गोष्टीला अपवाद नसून या किनाऱ्यावर हिंदू बांधवांची श्रद्धा असणारा श्रीमद्परमहंस श्रीजीवन्मुक्तस्वामी महाराज यांचा आश्रम आहे, तर किनाऱ्यावर मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असणारा हजरत सैय्यद मुकीमशाह कादरी यांचा दर्गा आहे. त्याबरोबर मागीण देवीचे देवस्थान आहे आणि याच किनाऱ्यावर ओएनजीसीचा प्रकल्प आहे. वर उल्लेख केलेली दोन्ही तीर्थक्षेत्र ही इतिहासाची साक्ष आहेत, अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पिरवाडीच्या समुद्रात काही पर्यटकांना सुबक कलाकृतीने पाषाणात कोरलेल्या हिंदू देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या. यातील काही मूर्ती पर्यटकांनी वर किनाऱ्यावर आणल्या आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सदरच्या मूर्ती उरण-पिरवाडी सागरकिनारा पट्टीवर स्थानिक रहिवाशांच्या मुलांना दिसल्या होत्या. त्यांनी सदरची महिती शिवराज युवा प्रतिष्टान यांना दिली. यावेळी शिवराज युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सदर जागेवर जाऊन पाहाणी केली असता, गणेश, मारुती व देवी देवतांच्या पाषाणी मूर्ती दिसल्या.

उरणमध्ये रामायणातील महत्त्व सांगणारा पौराणिक कथेबरोबर जोडला गेलेला द्रोणागिरी डोंगर आहे. त्याच बरोबरीने द्रोणागिरी किल्ला ही डोंगर माथ्यावर आहे. या पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असणाऱ्या परिसरात आदिवासींच्या वाड्या व कातकरी समाज्यांची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते. या डोंगर परिसरात अनेक वेळा उत्खनन झाले आहे. त्यावेळी या उत्खननात सदरच्या मूर्ती सापडल्या असाव्यात, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्या समुद्रात टाकून दिल्या असाव्यात, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पुरातत्त्व विभागच अधिकची माहिती देऊ शकेल असे सांगण्यात येत आहे. सध्यस्थितीत सदरच्या मूर्ती या किनाऱ्यावर आणण्यात स्थानिकांना यश आले असून एक पाषाणात कोरलेली मूर्ती समुद्रातच आहे. सदरची मूर्ती ही मोठी असून ती दहा व्यक्तींनाही उचलण्यास जड जात असल्याने यासाठी योग्य ती मदत घेऊन बाहेर काढण्यात येईल, असे शिवराज युवा प्रतिष्ठानकडून सांगण्यात येत आहे.

इतिहास अभ्यासक आणि पुरातत्त्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तींचा इतिहास व ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊन त्यानंतर त्याची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येईल. – संदेश ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, शिवराज युवा प्रतिष्टान

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -