Friday, April 19, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सAnarkali : ये ज़िन्दगी उसीकी हैं...

Anarkali : ये ज़िन्दगी उसीकी हैं…

‘अनारकली’ – १९५३ (Anarkali) हा एका हळव्या दंतकथेवर बेतलेला नितांत सुंदर चित्रपट! याच कथेवर, वेगवेगळ्या भाषात, याच नावाने, किमान ४ चित्रपट निघाले. जेव्हा बोलपट आलेले नव्हते तेव्हा याच नावाचा मूकपट सर्वात आधी म्हणजे १९२८ साली येऊन गेला होता.

अकबर आणि जोधाबाईचा मुलगा सलीम हा राजवाड्यातील एका नर्तकीच्या प्रेमात पडतो आणि त्याला तिच्याशी लग्न करायची इच्छा असते. हे उभयपक्षी प्रेम खूप मनस्वी असते. दोघेही आपापली सामाजिक पायरी विसरून एकमेकांच्या निस्सीम प्रेमात बुडालेले असतात. मात्र जेव्हा हे अकबराला कळते तेव्हा त्याला आपल्या पुत्राचा एका दासीशी असलेला प्रेमसंबंध मान्य होत नाही. त्यातून पितापुत्रात संघर्ष होतो. अनेक धमक्या देऊनही सलीमबद्दलचे प्रेम न संपवण्याच्या हट्टामुळे अनारकलीला भिंतीत चिणून मारायची शिक्षा ठोठावली जाते! या भयानक शिक्षेची अंमलबजावणी होतानाचा करुण प्रसंग दिग्दर्शक नंदलाल जसवंतलाल यांनी असा उभा केला होता की भल्याभल्यांना अश्रू आवरत नसत. त्यासाठी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले गीत, लतादीदीचा आर्त स्वर आणि त्याला सी. रामचंद्र यांचे संगीत म्हणजे कहर होता. आजही लाखो लोकांच्या मनात हे गाणे आणि तो प्रसंग जशाचा तसा, ताजा आहे!

कोवळ्या वयाची निरागस अनारकली भिंतीत चिणली जाते आहे. तिच्या तिन्ही बाजूना भिंत बांधून झालेली आहे. शेवटच्या बाजूंची भिंत बांधताना मजूर एकेक वीट रचत आहेत असे ते भयंकर दृश्य होते. त्याही वेळी अनारकली प्रेमाची महतीच गाते. या कठोर शिक्षेबद्दल तिची जराही तक्रार नाही. तिच्यासाठी जगणे म्हणजेच प्रेम आहे. प्रेम नसेल तर तिला जगण्यात काहीही रुची नाही. ती म्हणते-

ये ज़िन्दगी उसीकी है,
जो किसीका हो गया,
प्यारही में खो गया.
ये ज़िन्दगी उसीकी हैं…

राजपुत्र सलीम आणि त्याच्या दरबारातील दासीची ही कथा एका बेधुंद, उत्कट, वेड्या प्रेमाची गाथा आहे. प्रेमभावनेचा उन्माद मनात विलसत असताना माणसाला सर्वच गोष्टींबद्दल, व्यक्तींबद्दल, प्रेम वाटते. त्याला कुणाचाच राग येत नाही. एका अत्युच्य मानसिक अवस्थेत तो सर्वांनाच क्षमा करू शकतो. जणू सर्व विश्वातून प्रेमाचा अनाहत नादच त्याला ऐकू येत असतो. काहीशी अध्यात्माच्या आसपास जाणारी मनोवस्था! ती उन्मादी अवस्था राजेंद्र कृष्णन यांनी नेमक्या शब्दात मांडली आहे. डोळ्यांसमोर मरण दिसत असतानाही सलीमची ही जगावेगळी प्रेयसी निराशेच्या कोणत्याच सुराकडे लक्ष द्यायला तयार नाही. ती म्हणते सगळा आसमंत मला फक्त प्रेम करायचाच संदेश देतो आहे. जीवन तर क्षणभंगुर आहे, ते काही क्षणांनंतर धोका देऊन मला सोडून जाणारच आहे. पण मी जिवंत आहे तोवर प्रेमाचा आनंद का घेऊ नको? मृत्यू जर अपरिहार्यच आहे तर ज्या क्षणाला जिवंत आहोत त्याचा आनंद का सोडून देऊ?

ये बहार, ये समा, कह रहा है प्यार कर.
किसीकी आरज़ूमें अपने
दिलको बेक़रार कर.
ज़िन्दगी है बेवफ़ा, लूट प्यारका मज़ा,
ये ज़िन्दगी उसीकी है…

स्वत:हून मृत्यूला मिठी मारताना मनाची चलबिचल तर होणारच, हृदयाची धडधड वाढणारच पण आताचा हा क्षण तर आपला आहे ना? उद्यापासून काळ माझ्यासाठी थांबणार आहे. मृत्यूनंतर दिवस नाही की रात्र नाही, कबरीतल्या अंधारात मी ‘कयामत’च्या दिवसापर्यत शांत पडून तर राहणार आहे! आता मी या सुंदर जगात आहे आणि जिवंत आहे आणि कुणाच्या तरी प्रेमात आहे याचा आनंद का घेऊ नको?

धड़क रहा है दिल तो क्या, दिलकी धड़कनें ना गिन,
फिर कहाँ ये फ़ुर्सतें,
फिर कहाँ ये रात-दिन,
आ रही है ये सदा, मस्तियोंमें झूम जा.
ये ज़िन्दगी उसीकी है…

मृत्युसमोरही अनारकली निराश नाही. तिची श्रद्धा तिला पुन्हा दिलासा देते. इस्लाममधील न्यायाच्या दिवसाची संकल्पना अर्थात ‘कयामत’ची शेवटच्या ईश्वरी न्यायाची कल्पना तिच्या मनातली आशा तेवत ठेवते. ती म्हणते, ‘जिवलगा, ‘आपण या जगात भेटू शकत नाही तर कुठे बिघडले, कल्पांतानंतरच्या त्या दुसऱ्या जगात आपण नक्की भेटू! आपल्या इच्छाआकांक्षांची फुले जमिनीवर फुलू शकली नाहीत ती परमेश्वराच्या अंगणात नक्की फुलतील. हे क्षणभंगुर आयुष्य प्रेमासाठी गमवावे लागले तर कुठे बिघडले?

जो दिल यहाँ न मिल सके,
मिलेंगे उस जहानमें,
खिलेंगे हसरतोंके फूल,
जाके आसमानमें,
ये ज़िन्दगी चली गई जो
प्यारमें तो क्या हुआ?
ये ज़िन्दगी उसीकी है…

अनारकली तिच्याभोवती रचल्या जाणाऱ्या उभ्या कबरेतही स्वत:ला दिलासा देते. ती म्हणते, ‘माझी कबरच जगाला माझी कहाणी सांगेल. माझे डाळिंबाच्या कळीसारखे जगणे शिशिरातही फुललेले होते. माझ्या कबरीला थडगे कधीच म्हणू नका! हा तर माझ्या प्रेमाचा महाल आहे!

सुनाएगी ये दास्तां, शमा मेरे मज़ारकी
फ़िज़ामें भी खिली रही,
ये कली अनारकी
इसे मज़ार मत कहो, ये महल है प्यारका
ये ज़िन्दगी उसीकी है…

शेवटच्या कडव्यात कुणाही संवेदनशील मनाला अश्रू अनावर होतात. शेवटच्या संध्याकाळी ती मृत्यूला म्हणते, ‘ये, जवळ ये. मला तुला मिठीत घेऊ दे. तुझ्या मिठीत मला जगाला विसरू दे. फक्त शेवटी एकदा माझ्या जीवलगाचा मला निरोप घेऊ दे. अलविदा… अलविदा…

ऐ ज़िंदगीकी शाम आ,
तुझे गले लगाऊं मैं,
तुझीमें डूब जाऊं मैं,
जहांको भूल जाऊं मैं.
बस इक नज़र, मेरे सनम,
अल्विदा, अल्विदा…

कसले हे शब्द, कसले संगीत आणि लतादीदींचा कसला तो काळीज चिरत जाणारा स्वर! सगळेच जीवघेणे!

-श्रीनिवास बेलसरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -