Thursday, April 18, 2024

आमरस

सकाळी सकाळी व्हाॅट्सअॅपवर ढीगभर मेसेज “हॅपी मेन्स डे” आणि एक प्रसंग आठवला. आंब्याचे दिवस. रविवार दुपार, आमरसाचा बेत. आता, आमरसाचा बेत म्हणजे फक्त आणि फक्त आमरस पुरी. नंतर अगदीच वाटलं तर आमटी भात. चौथा पदार्थ नाही. मनसोक्त आमरस ओरपणे हा एकमेव कार्यक्रम. सकाळपासून तयारी. आमरसाच्या वाट्या भरल्या. साधारण ५ वी, ६ वी संपली असेल. आमरसाचा टोप संपत आलेला. उरलेला संपवता संपवता बायकोने २ शेवटच्या वाट्या भरल्या. एक थोडीशी जास्त, एक कमी.

जास्त भरलेली वाटी लेकाच्या ताटात गेली. दुसरी माझ्याकडे. मी त्या वाट्यांकडे बघतोय हे बायकोने बघितलं, एकच वाक्य (जरा करड्या आवाजात )…” माझं कोकरू आहे न ते” (१७ वर्षांच !!!!) दुसरा प्रसंग. मी साधारण दहा-बारा वर्षांचा. असाच आमरसाचा प्रोग्राम. आमरसाचा टोप संपत आलेला. उरलेला संपवता संपवता आईने २ शेवटच्या वाट्या भरल्या. एक थोडीशी जास्त, एक कमी. जास्त भरलेली वाटी माझ्या ताटात. दुसरी बाबांकडे. बाबा त्या वाट्यांकडे बघताहेत हे आईने बघितलं, एकच वाक्य (खरे तर काहीच शब्द नाहीत)…

असो… कालचक्र बदललं, जग, संपत्तिक स्थिती, एक अख्खी पिढी… अगदी, सगळं सगळं बदललं. आईच्या जागी बायको आली, बाबांच्या जागी मी आलो… नाही बदलली फक्त, पुरुषाच्या आयुष्यात येणारी तृप्ततेची ढेकर, थोड्या कमी आमरसाच्या वाटीने येणारी.

-डॉ. मिलिंद घारपुरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -