Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : राज्यपालांच्या विरोधात; महाआघाडीचा थयथयाट

अग्रलेख : राज्यपालांच्या विरोधात; महाआघाडीचा थयथयाट

केवळ महाराष्ट्रातच नाही, तर अनेक राज्यांत राज्यपाल विरुद्ध तेथील सरकार यांच्यात संघर्ष चालू असतो. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाआघाडीचे सरकार होते, तेव्हा अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल असे संघर्षाचे वारंवार प्रसंग उद्भवले. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे युती सरकार आहे. शिंदे-फडणवीस हे हिंदुत्वाच्या विचारासाठी एकत्र आले आहेत. गेल्या पाच महिन्यांत राजभवन विरुद्ध मंत्रालय असा वाद राज्यात उद्भवला नाही. उद्धव गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष आज विरोधी पक्षात आहेत. महाआघाडीचे सरकार पाच वर्षांची टर्म पूर्ण न करताच पडल्याने ते सर्व दुखावलेले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारवर संधी मिळेल तेव्हा महाआघाडीतील तीनही पक्ष तुटून पडतात. पण हे सरकार अस्थिर होत नसल्याने ठाकरे, पवार आणि पटोले हे बोटे मोडत बसतात. आपले सरकार पडल्याचा राग महाआघाडीचे नेते राज्यपालांवर कसा जोरात काढत आहेत, हेच राज्यातील जनतेला गेल्या चार दिवसांत अनुभवायला मिळाले.

राज्यपाल कोश्यारी यांनी महाआघाडीला पाहिजे तसे विधान परिषदेचे आमदार मान्य केले नाहीत हा ठाकरे, पवार, पटोले यांचा जुना राग आहेच. त्यात पुन्हा त्यांचे सरकारच पडल्यापासून तो संताप राज्यपालांवर निघतो आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना हटवण्यासाठी चंग बांधलेला दिसतो…, हे चाळे आता बस्स झाले. राज्यपालांचे सॅम्पल कुठेही पाठवा, वृद्धाश्रमात पाठवा अशी खदखद त्यांची बाहेर पडली. कोश्यारींना हटवा, नाही तर महाराष्ट्राचा इंगा दाखवू… अशी केंद्र सरकारला धमकी त्यांनी दिली आहे. राज्यपाल हटावो मोहिमेसाठी महाराष्ट्र बंद की विराट मोर्चा हे चार दिवसांत ठरवणार असे त्यांनी जाहीर केले. याचा अर्थ त्यांनी केंद्र सरकारला कोश्यारींना राज्यपालपदावरून हटविण्यासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती महाराजांशी तुलना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डिलिट पदवी देण्यात आली. कोश्यारी हे या कार्यक्रमाला कुलपती म्हणून उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपालांनी केल्यामुळे त्या विरोधात वादळ निर्माण झाले व राज्यभर महाविकास आघाडीने संताप प्रकट केला. राज्यपाल कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत होतो, तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे की, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग कुणाला सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, कुणाला नेहरू. ज्याला जो नेता आवडायचा तो त्याचे नाव घेत असे. मला असं वाटतं की, जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे आवडते आदर्श कोण आहेत, तर बाहेर कुठे जायची गरज नाही, इथेच महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले व त्यावरून वाद सुरू झाला.

छत्रपतींचे वंशज असणारे उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा संताप प्रकट करीत सर्वप्रथम समाचार घेतला. उदयनराजे हे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी थेट पंतप्रधानांनाच पत्र पाठवून राज्यपालांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली, मग शरद पवार यांनी राज्यपालांनी सर्व मर्यांदांचे उल्लंघन केले असल्याची टीका करून या संदर्भात राष्ट्रपती व पंतप्रधानांनी काय तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली. वादग्रस्त राज्यपालांना हटवा हा त्यांचा सूर होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचे सांगून महाराष्ट्र बंदची धमकी दिली. जी काही शक्कल आहे, ती केवळ काळी टोपीतून आलेली नाही, त्यामागे कोण आहे, सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा सुद्धा शोध घेण्याची वेळ आली आहे, अशी टीका करण्यापर्यंत उद्धव यांची पातळी घसरली. राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात महाआघाडीचे तीनही पक्ष आज थयथयाट करीत आहेत. महाराष्ट्र बंद पुकारण्याची धमकी देऊन उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारवर दबाव आणत आहेत.

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे हे महाआघाडीत सर्व जण जाणतात. राज्यपालांच्या नेमणुका किंवा बदल्या या विरोधी पक्षाला कधी विचारून होत नाहीत. शिंदे, फडणवीस आणि कोश्यारी यांच्यावर तोंडसुख घ्यायचे हे एकच काम महाआघाडीला सध्या उरले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत मुंबई व महाराष्ट्र बंद झाले, पण ते जनतेच्या प्रश्नावर किंवा राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विषयावर होते. महाआघाडी सत्तेवर असताना दुसऱ्या राज्यातील घटनेबद्दल महाराष्ट्र बंद पुकारण्याचा पराक्रम केला होता. स्वत: सरकारच बंद पुकारते हे तत्कालीन ठाकरे सरकारने करून दाखवले. राज्यपाल कोश्यारींनी जे वादग्रस्त वक्तव्य केले, त्याचे कोणी समर्थन करणार नाही, पण त्यामागचे व पुढचे संदर्भही लक्षात घेतले पाहिजेत. त्याचा हेतू आक्षेपार्ह होता काय? ते स्वत: मुख्यमंत्री होते, उच्चशिक्षित आहेत, त्यांना अनेक भाषा येतात, ते संस्कृतमध्ये उत्तम बोलू शकतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून ते घडलेले आहेत. मग ते छत्रपतींचा अवमान करणारे भाष्य कसे करू शकतील? मुख्यमंत्र्यांना लाचार म्हणणे, मिंधे गटाचे सरकार संबोधणे, सडका मेंदू अशी भाषा वापरणे हे पक्षप्रमुखाला शोभा देते काय?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -