Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसावलीसारखी सोबत

सावलीसारखी सोबत

सतीश पाटणकर

सहचारिणी म्हणजे सप्तपदीतील वचने मूर्त रूपात जगणारी अर्धांगिनी. एक स्त्री आपल्या आयुष्यात अनंत भूमिका बजावत असते. पहिल्यांदा कोणाची तरी मुलगी, मग पत्नी आणि आई. आयुष्याच्या वाटेवर अशा बहुरंगी भूमिका बजावत स्त्री लग्न झाल्यावर जेव्हा आपली सासरी मायेची माणसे सोडून एका अनोळखी घरात वातावरणात, अनोळखी माणसाच्या माणसांमध्ये जाते तेथे ती आपल्या आवडी-निवडी बाजूला सारून त्या घरातील सौख्यासाठी जगते, त्यामुळेच की काय सहचारिणीच्या लाभलेल्या खंबीर साथीमुळे आयुष्यात यशस्वी होऊ शकलेल्या पुरुषांची असंख्य उदाहरणे देता येतील. म्हणूनच यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. आपल्या वावरण्याने कुठल्याही नातेसंबंधांना झळ लागू न देता आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कायम उभी राहणारी जिद्दी सोशिक अशी ही सहचारिणी असते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचंड कार्यात सतत काळजी वाहणारी, खंबीरपणे साथ देणारी अर्धागिनी सौ. निलमताई पत्नी म्हणून त्यांना लाभली आहे. आजच्या स्वयंसिद्ध स्त्रीचे ते प्रतिरूप आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. पण एका पुरुषाच्या आयुष्याला तिच्या येण्याने मिळणारी कलाटणी म्हणजे त्याचे जीवनच स्वर्ग बनवून टाकण्याची सुखावत असते. उत्तम सहचारिणी लावणे म्हणजे एक दैवी देणगीच आहे.

राणेसाहेबांनी शून्यातून सुरू केलेल्या राजकीय प्रवासाचे कौतुक करताना खरं तर निलमताईंचे अगदी मनापासून अभिनंदन करायला हवे. राणेसाहेब यांच्या कठीण काळात त्यांच्या पत्नी निलमताई या त्यांच्या पाठीशी कायम उभ्या राहिलेल्या आपणास पाहायला मिळतात. एकदा सार्वजनिक आणि राजकीय जीवनात वावरायचे ठरवल्यानंतर त्याचे फायदे-तोटे स्वीकारावे लागतात. नेहमीच चांगले दिवस येतील, असे मानता येत नाही.

चांगले दिवस अनुभवले, आता थोडा वेगळा अनुभव घेऊ या, असे समजूनच उद्याचा दिवस चांगला उगवेल या भावनेतून निलमताईंनी सातत्याने राणेसाहेबांना साथ दिली आहे. राणेसाहेब या व्यक्तिमत्त्वाचे एक पैलू आहेत असे नाही. अनेक पैलू त्यांच्याजवळ आहेत. कोकण परिसर त्यांनी ज्या पद्धतीने चौफेर विकासाने आघाडीवर नेला आहे, त्याला तोड नाही. त्यांनी एक नाही अनेक संस्था कोकणात उभ्या केल्या आणि त्या अतिशय व्यवस्थितपणे चालवल्या. जबाबदारी वाटून द्यायची आणि विश्वास टाकून काम करून घ्यायचे, अशी एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी अनेक माणसे घडवली. अनेक संस्था उभ्या केल्या आणि हे सर्व करीत असताना त्यांची भूमिका जे विषय माहीत नाहीत, ते विषय नीटपणे समजून घ्यायची तयारी असल्यामुळे नेहमी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहताना त्यांना संकोच वाटला नाही.

उत्तम शेती किंवा उद्योगधंदा करणाऱ्याच्या शेतात जाऊन त्याने केलेल्या विविध प्रयोगांची किंवा उद्योगाची माहिती घेण्यात त्यांना कधी संकोच वाटत नाही. त्यामुळे असे अनेक विलक्षण गुण असलेला हा नेता आहे. पण अशा राणेसाहेबांची पत्नी असणे हे पाहणाऱ्याला राजमुकुट मिरवल्यासारखे वाटेल. पण हा मुकुट किती काटेरी आहे, ते धारण करणाऱ्यालाच ठाऊक. हे येऱ्या गबाळ्याचे कामच नव्हे. ती उत्तम गृहिणी तर हवीच; पण त्याचबरोबर तिला राजकारण आणि समाजकारणाचे भान हवे. समाजाच्या सर्व थरांतून न अवघडता वावरण्याची सहजता हवी. प्रसंगावधान तर हवेच हवे; पण हजरजबाबीपणा व निर्णयक्षमताही हवी. आदरातिथ्य हवे, तसाच सोशिकपणाही हवा. मुख्य म्हणजे वेळेचे उत्तम नियोजन हवे. ज्या लोकांकरिता नारायण राणेसाहेबांनी दिवस-रात्र कधी बघितली नाही, सतत त्यांच्या डोक्यात एकच विचार असायचा, तो म्हणजे ‘माझे कोकण. माझे कोकण, कोकणासाठी हे करू, कोकणासाठी ते करू’ अशी गेली अनेक वर्षे डोक्यात एकच विचार ठेवून किती लोकांना त्यांनी मदत केली असेल, याचा काही हिशोब नाही. असे असताना अगदी जवळची वाटणारी माणसे उलटू शकतात, फसवू शकतात आणि जी माणसे मोठी वाटतात ती खोटी असतात, हे जेव्हा जाणवते तेव्हा त्याचे निलमताईंना खूप दु:ख होते.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे एक सुभाषित आहे. त्याचे अनेक विनोदी अवतारही प्रसिद्ध आहेत. गृहिणी सचिव हे तर आपल्याकडे सर्वमान्य भाषित आहे; परंतु सचिव किंवा कसलीही बिरुदावली न मिरवता निलमताई शांतपणे घरची आघाडी सांभाळत असतात. न बोलता त्या राणेसाहेबांच्या बरोबरीने एक एक जबाबदारी उचलत असतात आणि बिनबोभाट पार पाडत असतात. निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको. कामे कित्येक पटींनी वाढलेली असतात. कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असते. क्षणाक्षणाला फोन घणघणत असतात. राणेसाहेब प्रचार-दौऱ्यावर रोज दहा-बारा प्रचारसभा घेत वणावणा फिरत असतात. अशा वेळी निलमताई हे सारं हसत-खेळत न कंटाळता सांभाळतात. तयार होऊन न्याहरी होईपर्यंत लोकं यायला सुरुवात, मग दिवसभर माणसांचा राबता, घरीपण आणि मुंबईच्या कार्यालयात पण. माणसांमध्ये राहायची त्यांना सवय झाली आहे.

आज लोकांना खरे वाटणार नाही, पण नारायण राणे मुख्यमंत्री असताना किंवा उद्योगमंत्री असताना पंच-सप्ततारांकित हॉटेलमधील ‘डिनर’ची अनेक ‘इन्व्हिटेशन्स’ त्यांच्या टेबलावर रोज पडून असायची. पण नारायण राणे कधीही बाहेर जेवलेले नाहीत. राज्यशिष्टाचारानुसार ते अशा समारंभांना गेले, तर सूप पिऊन सर्वांची माफी मागून जेवायला घरी पोहोचायचे. हा आग्रह निलमताईंचाच. प्रत्येक स्त्रीला स्वयंरोजगार, स्वयंविकास, स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. त्यासाठी तिला तिच्या आवडीप्रमाणे जगण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे, प्रत्येक विभागात महिलांचा एक छोटा गट तयार करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. छोटे-मोठे घरगुती उद्योग करण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करता निलमताईंनी सिंधुदुर्गात ‘जिजाऊ’ संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ दिले. फणसपोळीपासून अगदी कापड उद्योगापर्यंत महिला आज या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत. दीड लाख रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत या महिला पगार घेतात. मुंबईतून गावी वास्तव्यास गेलेल्या एका महिलेला ‘जिजाऊ’ संस्थेमुळे काम मिळाले. आज ती महिला महिना १२ हजार रुपये कमावते.

महाराष्ट्रात काही जोडपी अशी आहेत की, त्यांना ‘एक दुजे के लिए’ असेच म्हणता येईल. यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई, शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई, विलासराव देशमुख आणि वैशाली, शरद पवार आणि प्रतिभाताई, अगदी त्याचप्रमाणे नारायणराव राणे आणि निलमताई यांची जोडी आहे. लग्नाआधी राजकारणाचा आणि त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. राणे कुटुंबात आल्यानंतर जबाबदारी अंगावर पडत गेली, तशा त्या सक्रिय होत गेल्या. घर पूर्णपणे सांभाळायचे निलमताईंनी, घराचा सगळा व्यवहार बघायचा निलमताईंनी. कुटुंबाची जबाबदारी निलमताईंवर, संपूर्ण कुटुंब एकाच टेबलावर जेवण्याची शिस्त निलमताईंची. राणेसाहेब कितीही व्यापात असले तरी ९ वाजण्याच्या आत त्यांनी घरात यायलाच हवे, हा आग्रह निलमताईंचाच. मालवण-कणकवलीचा दौरा असो, नाहीतर लंडनचा, नारायण राणे कधी कुठे एकटे गेले नाहीत आणि जात नाहीत. निलमताई सावलीसारख्या सोबत आहेतच.

समोर आलेले विषय हाताळण्याचा निलमताई यांचा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. साहजिकच याचा फायदा राणे कुटुंबीयांना होतो. राजकारणात नेहमी पायघड्या मिळत नाही, कधी-कधी काटेही मिळतात, रस्त्यावर उतरून तुम्ही ओरडत नाही, तोपर्यंत तुमची कोणीही दखल घेत नाही या वाक्यांवरून राणेसाहेब हे मीडियाची नस कशी ओळखून आहेत, हे आपण समजू शकतो. मानसिकता बदलल्याशिवाय सामाजिक बदल शक्यच नाही, असे विचार रोखठोकपणे मांडणाऱ्या निलमताई या बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या वहिनीसाहेब आहेत. तरी या वहिनीसाहेब सोशल मीडिया आणि मुख्य माध्यमांच्या प्रवाहापासूनही दूर आहेत. राणे घराच्या सूनबाई म्हणजे निलमताई.

निलमताईंनी घर आणि संसार भक्कमपणे सांभाळल्यानेच राणेसाहेब राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातल्या गोळाबेरीज बिनधास्त करू शकले एवढे मात्र निश्चित. वहिनींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेछा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -