Thursday, March 28, 2024
Homeताज्या घडामोडीअब्दुल सत्तारांची जीभ घसरली!

अब्दुल सत्तारांची जीभ घसरली!

सुप्रिया सुळेंबद्दल उच्चारले अपशब्द; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर म्हणाले, सॉरी…

औरंगाबाद : ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ’, असे वादग्रस्त वक्तव्य करून कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईत सत्तारांच्या घरावर दगडफेक करत घराच्या काचा फोडल्या. तर काही ठिकाणी सत्तारांच्या बॅनरला फटके मारत प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि बलात्कारी आरोपीला वाचवणाऱ्या रवींद्र चव्हाण या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना २४ तासांत शब्द मागे घेत माफी मागावी, असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळू म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होताच, अब्दुल सत्तार यांनी कुणाची मने दुखवले असतील, तर सॉरी म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची एका वृत्तवाहिनीशी बोलताना जीभ घसरली. सत्तार म्हणाले की, ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत. ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ. आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल. ज्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे, त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके-खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो’, असे सत्तार म्हणाले.

दरम्यान, प्रकरण पेटताच सत्तारांनी सॉरी म्हणत मी कोणाबद्दलही काही बोललो नाही. कोणत्याही महिलांची मने दुखावली असे बोललो नाही. कोणाला वाईट वाटले असेल, तर मी खेद व्यक्त करतो, म्हणत माफी मागितली. मी फक्त खोक्याबद्दल बोललो. महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही. पुढेही बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. सॉरी, असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -