डॉ. प्राची बामणे

‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे..!’ गाण्याचे बोल सर्वानाच आठवत असतील. आयुष्य म्हटलं तर गुणगुणत जगलं जातं, तर कधी रडत-कढत. कधी आनंदात, तर कधी कंटाळवाणं. आयुष्यात येणा-या अनेक घटनांवर आयुष्य जगण्याचे पैलू ठरत असतात. मात्र, आयुष्याचा विचार केला, तर आयुष्य म्हणजे काय? आयुष्याचा अर्थ?काय? याचा विचार करायला खरंच कुणाला वेळ आहे का? व्हॉट्सअ‍ॅपवरचे स्टेट्स अपडेट करायला, खबरबात करायला, सिनेमा बघायला सर्वानाच वेळ आहे.

पण, आयुष्यावर बोलायला कुणाला वेळ आहे?
खरं तर आयुष्य या साडेतीन शब्दांचा अर्थ दडलेल्या रहस्याचा उलगडा अजून कोणाला झालाय आणि होणे देखील कठीणच.

आयुष्य काय असतं, हे सीमेवर लढणा-या त्या जवानाला विचारा. जो आपल्या कुटुंबाचा मोह सोडून करोडो लोकांचे परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रं-दिवस जीवाचे रान करत असतो.
आयुष्य म्हणजे काय, हे नवजात अर्भकाला विचारा. ज्याचा नुकताच जन्म झालेला असतो आणि काही कारणास्तव त्याचे जन्मदाते आई-वडील आपल्या रक्ताच्या बालकाला अनाथाश्रमात सोडून जातात.

आयुष्य म्हणजे काय, हे त्या स्त्रीला विचारा, जी आपलं २०-३० वर्षाचं आयुष्य आपल्या आई-वडिलांच्या छत्रछायेत घालवून पुढील आयुष्याची नव्याने सुरुवात करते. पुढील आयुष्यात सुख की दु:ख माहीत नसूनही त्या घरात आपलं सारं आयुष्य व्यतीत करते.
आयुष्य म्हणजे काय, हे आई-वडिलांना विचारा. ज्यांची मुले त्यांना गरज असते तेव्हा दूर करून वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात.

आयुष्य म्हणजे काय? अशा अनेक व्याख्या मनात येतील. प्रत्येक व्यक्तीची व्याख्या ही ज्याच्या – त्याच्या परिस्थितीनुसार बदलत जाईल आणि ते योग्य देखील आहे. कारण, प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो.

मग हे आयुष्य जर इतकं वेगळं आहे, तर मग सहजासहजी संपविले का जाते? कधी आत्महत्या करून तर कधी दुस-यांची हत्या करून आणि वाईट प्रवृत्तीचे अनुकरण करून या आयुष्याचा अर्थच बदलून जातो. या समाजातील दुष्ट प्रवृत्ती, नकारात्मक विचार बदलायचे असतील, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की, अर्थ समजून घ्यावा आयुष्याचा. प्रत्येकाने हरएक गोष्टीकडे सकारात्मक प्रवृत्तीने वागावे. जेणेकरून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुधारेल.

दु:ख टाळणं ही जगण्याची कला आहे. म्हणजेच नकारात्मक गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहणं यालाच खरी पॉझिटीव्हिटी म्हटले जाते.
आयुष्य हे खूप छोटं पण विशाल आहे. आयुष्यात छोटय़ा-मोठय़ा कुरबुरी असतात. चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. कुछ खट्टी, कुछ मिठी अशीच जगायची असते जिंदगी. पण म्हणून संपवू नका असे आयुष्य. ज्याला मिळते त्याला नसते किंमत. ज्याला मिळत नाही, त्यालाच कळते त्याची ताकद.

म्हणूनच म्हणेन, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!
खरं सांगायचं तर, दुनिया असेल मोठी, पण अनिश्चित आहे जिंदगी याची साथ देत राहा, तरच ती पण सोबत येईल तुमच्या अपयश तर येत राहणार, म्हणून खचून जाऊ नका हसतमुखाने निर्भयपणे जो पडून परत उभा राहिला, तोच खरं आयुष्य जगला.. तोच खरं आयुष्य जगला.