Thursday, April 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजआरोग्यं धन संपदा

आरोग्यं धन संपदा

डॉ. लीना राजवाडे

झेंडा भला कामाचा तो घेऊन निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचती तेला
रगतं निघलं तरी बी हसल शाबास तेचि
तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची !!

नवीन वर्षात पदार्पण करताना प्रत्येक सवंगडी माणसासाठी मग तो अगदी छोटा मुलगा असू देत किंवा मोठा वयोवृद्ध माणूस प्रत्येकासाठी हे एकच गाणे गावेसे वाटते.

खरंच, प्रत्येक सवंगडी आपापल्या परीने या सरत्या वर्षाला निरोप देताना अशाच वेगळ्या मानसिकतेने आयुष्याची दिशा ठरवू पाहतो आहे. आयुष्यात आरोग्याची गुरुकिल्ली नेमकी कशी शोधायची याचा शोध घेतो आहे.

या नवीन वर्षाच्या निमित्ताने “आरोग्यासाठी गुंतवणूक” ही कल्पना जनमानसांत रुजावी. अनारोग्यापासून दूर जाण्याची गरज आणि इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे. “नव्हे हे कळतंय देखील, पण कळलेलं वळत नाही” अशी काहीशी गत झाली आहे.
अनारोग्यकर मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड प्रॉब्लेम हे कमी होते की, काय म्हणून यांच्या जोडीला स्थौल्य, नैराश्य अशा कितीतरी लेबल्सशी चिकटून, औषधांबरोबर जगणं ही नवीन जीवनशैली आपण ‘New age धनसंपदा’ म्हणून आजवर मिरवत आलो आहोत.
सवंगड्यांनो, पण आता वेळ आलीय जागे व्हायची. आरोग्यपूर्ण जीवन म्हणजे नेमकं काय समजून घेण्याची. चला तर मग ‘आरोग्यं धनसंपदा’ ही संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करूया.

आज भारताकडे असणारे अनेक क्षेत्रांतले ज्ञान, ज्याच्याकडे संपूर्ण जग नव्या जगाची आशा म्हणून पाहते आहे. याच भारत देशात जिथे पूर्वी सोन्याचा धूर निघत होता! भारत किती संपन्न देश होता, हेच यातून समजते.

अशा या भारताचे आपले वैद्यकशास्त्र आरोग्याविषयी नेमके काय सांगते? हे शास्त्र म्हणून जनमानसांत समजले पाहिजे. योग या संकल्पनेेला जशी आज जगभरात मान्यता मिळाली आहे, तसेच शाश्वत विकासासाठी अनादि कालापासून असणारे मूलभूत सिद्धांत असणारे वैद्यकशास्त्र हे आपले पहिले वैद्यकशास्त्र म्हणून सर्वांना समजले पाहिजे.

राजमान्य असा त्याला दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी ही संकल्पना मनात घेऊन कृतीत आणण्यासाठी ‘आरोग्यं धनसंपदा’ ही लेखमाला लिहून आपल्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

भारतीय ज्ञानसंपदेचा अमूल्य ठेवा म्हणजे सोळा विद्या आणि चौसष्ठ कला. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे ‘वैद्यकशास्त्र.’ हे नेमके काय आहे? शास्त्र म्हणून आपण ते नेमकेपणाने कसे जाणायला हवे, यासाठी त्याकडे डोळसपणाने बघायला सुरुवात करायला हवी. याचसाठी मी माझ्या वीसहून अधिक वर्षे वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव घेत असल्याने जाणवले की, आरोग्याविषयी खरी संकल्पना माझ्यासकट सगळ्या माझ्या सवंगड्यांना मुळापासून समजून घेतली पाहिजे. या लेखमालेतून मी असेच आरोग्याविषयी नव्याने लिहून ते आपल्यासाठी घेऊन येते आहे. आज जाणून घेऊयात आरोग्य म्हणजे काय, त्याचे मूळ उद्दिष्ट काय?

‘धर्मार्थकाममोक्षाणां आरोग्यं मूलमुत्तमम्’
हे वचन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजच्या काळात नव्याने ही उक्ती समजून घेऊया.
धर्म! धारणात् धर्मः। जो धारण केला जातो तो धर्म. त्यामुळे लहान मुलांना जर ती शाळेत जातात, तर शिक्षण घेणं (ज्ञानार्जन) हा त्याच्यासाठी धर्म असेल.

राज्यकर्ते मंडळी यांच्यासाठी सामाजिक बांधिलकी हा धर्म असेल आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे डाॅक्टर यांच्यासाठी लोकांना आरोग्य लाभावे म्हणून स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणे, हा धर्म असेल. यानंतर आपण जे ज्ञान मिळवले आहे, ते वापरून मिळणारा पैसा, त्याचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. धर्म आणि अर्थ याचा उपयोग वैयक्तिक चरितार्थ चालवण्यासाठी आणि समाजाची बांधिलकी यासाठी व्हायला हवा. धर्म, अर्थ हे दोनही पुरुषार्थ सकारात्मक मानसिकतेत समजून घेण्याची इच्छा (काम) एकदा का मनात रुजायला सुरुवात झाली की, अनारोग्यापासून मोक्ष मिळवण्यासाठी (उच्च रक्तदाब, मधुमेह एवढेच काय तर स्थौल्य, नैराश्य अशा कितीतरी अनारोग्यकर लेबल्सशी चिकटून औषधाबरोबर जगणं) ही नवीन जीवनशैली बाजूला सारत खऱ्या अर्थाने आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारताना सोपे होऊ शकेल.

सवंगड्यांनो चला तर मग, आनंदाने नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया आणि गाऊया,
चाल पुढं…
नको रं गड्या भीती कशाची… परवा बी कुनाची…
हीच आरोग्याची आजची गुरुकिल्ली “आरोग्यं धन संपदा”
पुढील लेखात पाहू, आरोग्यपूर्ण जीवन म्हणजे नेमकं काय? भारतीय वैद्यकशास्त्र नेमके काय सांगते? आणि आरोग्याविषयी बरंच काही…
“सर्वांना सुख लाभावे, जशी आरोग्य संपदा”
धन्यवाद!
leena_rajwade@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -