Tuesday, April 23, 2024
Homeमहत्वाची बातमी“आ गुजरात, में बनाव्युं छे”

“आ गुजरात, में बनाव्युं छे”

”गुजरात मी घडवला आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पाच शब्दांनी गुजरातमधील मतदारांवर जादू झाली आहे. प्रत्येक गुजराती माणसाला आपल्या राज्याबद्दल आणि राज्याने केलेल्या विकासाबद्दल अभिमान वाटत आहे. राज्याच्या विकासात व उभारणीत आपला वाटा आहे, अशी भावना मोदींनी गुजरातमधील प्रत्येकाच्या मनात बिंबवली आहे. “आ गुजरात, में बनाव्युं छे” या पाच शब्दांनी गुजरातच्या अस्मितेला मोदींनी हाक दिली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप), ओवेसी यांचा आयएमआयएम मैदानात उतरले आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस आहे. ओवेसी यांचा पक्ष काँग्रेसचे किती नुकसान करणार, हे बघायचे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आहेत आणि गुजरातमधील जनतेला दिल्ली मॉडेलचे अामिष दाखवत आहेत. पंतप्रधान मोदींनी अपेक्षेप्रमाणे प्रचारात मुसंडी मारली आहे. मोदींच्या लोकप्रियतेला तोड नाही आणि त्यांना पर्याय नाही, हे या निवडणुकीत पुन्हा पुन्हा दिसून येत आहे.

मोदींच्या भाषणांची जेवढी चर्चा होते, तशी आप आणि काँग्रेसच्या प्रचाराची होत नाही. मोदींनी एका जाहीर सभेत म्हटले, “आ गुजरात, में बनाव्युं छे” या एका वाक्याने संपूर्ण गुजराती जनतेत विलक्षण ऊर्जा निर्माण झाली. गुजरातला बदनाम करण्याची जे मोहीम चालवत आहेत, ते यशस्वी ठरणार नाहीत, अशा कडक शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. मोदींनी गुजराती अस्मितेलाच हात घातल्याने विरोधकांची मोठी तारांबळ उडाली आहे. सलग १३ वर्षे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. २०१४ व २०१९ असे सलग दुसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान झाले तरी त्यांची नाळ ही गुजरातशी जोडलेली आहे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचे गुजरात हे गृहराज्य असल्यानेच गुजरातच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. अन्य राज्याची सत्ता मिळवतानाही भाजपचा प्रमुख चेहरा हे मोदीच असतात. गुजरात तर मोदींचेच राज्य आहे, त्यामुळे मोदींची स्वत:ची ओढ आपल्या राज्याकडे आहेच.

“गुजरातला मी घडवले आहे”,… या शब्दांत गुजरातचा अभिमान व अस्मिता सामावलेली आहे. गुजरातमधील बलसाडमध्ये मोदींनी अर्धा तास भाषण केले. “आ गुजरात, में बनाव्युं छे…” अशी घोषणा अनेकदा दिली. एवढेच नव्हे, तर लोकांनीही त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला. गुजराती माणसाचा अवमान आणि गुजरातची बदनामी सहन केली जाणार नाही, तसे जे करतील त्यांना गुजरातच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

गुजरातच्या लोकांनी कठोर परिश्रम घेऊन गुजरातची उभारणी केली आहे, कोणत्याही परिस्थितीत या राज्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे खडसावताना मोदींनी कोणत्याही एका पक्षाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा निशाणा आपकडे होता. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेलची देशभर चर्चा झाली. गुजरातच्या धर्तीवर सर्व देशाचा विकास केला जाईल, असे भाजप सांगत होता. गुजरात मॉडेलविषयी देशभर मोठी उत्सुकता होती. पण या निवडणुकीत केजरीवाल हे दिल्ली मॉडेलचा गुजरातमध्ये प्रचार करीत आहेत. केजरीवाल दिल्लीतील शाळांची गुजरातमधील शाळांबरोबर तुलना करीत आहेत. दिल्लीत आपल्या सरकारने शाळा कशा सुंदर व दर्जेदार बनवल्या हे सांगत आहेत. भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून छेडण्याचाही ते प्रयत्न करीत आहेत. भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी-गणपतीची चित्रे असावीत, अशी त्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली. केजरीवाल यांच्या या मागणीला एक दिवस देशभर प्रसिद्धी मिळाली. पण नंतर तो मुद्दा प्रचाराच्या गर्दीत हरवून गेला.

सन २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातच्या चाव्या मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या हातात होत्या. या काळात मोदींनी राज्याच्या केलेल्या सर्वांगीण विकासाची चर्चा विदेशातही झाली. गुजरात मॉडेल म्हणून त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गुजरातची विकास यात्रा यापुढेही सुरूच राहील, असा विश्वास व्यक्त केला होता तसेच पंतप्रधान झालो असलो तरी गुजरातकडे विशेष लक्ष देईन, असे आश्वासनही दिले होते.

आपल्यावर गुजराती जनतेचा पहिला हक्क राहील, असे त्यांनी राज्यातील जनतेला आवर्जून सांगितले होते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये कच्छला मोठा भूकंप झाला. त्यावेळी त्यांनी भूकंपग्रस्त भागाला संकटातून बाहेर काढण्यासाठी अविश्रांत मेहनत केलीच, पण विकासाला गती मिळावी म्हणून वेगवेगळे प्रयोगही केले. गुजरातमध्ये देश-विदेशातून मोठी गुंतवणूक व्हावी म्हणून व्हायब्रंट गुजरातसारखे मोठे कार्यक्रम मोदींनी नियमित साजरे केले. त्यापासून देशातील अनेक राज्यांनी प्रेरणा घेतली व तसे कार्यक्रम सुरू केले. गुजरातचे रँकिंग देशात सर्वात आघाडीवर असेल, याची मोदी यांनी सदैव काळजी घेतली.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाची वेगळी व विशेष ओळख आजही कायम आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शंभरपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून त्याची आजही चर्चा ऐकायला मिळते. २०१७ मध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. यंदा २०२२ मध्ये भाजपसमोर काँग्रेस, आप आणि ओवेसी दंड थोपटत आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक असली तरी भाजपचा प्रमुख चेहरा हा नरेंद्र मोदी हेच आहेत.

आपचा चेहरा अरविंद केजरीवाल हेच आहेत. भाजपचे मोदी, आपचे केजरीवाल किंवा एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हे तिघेही स्वत: निवडणूक लढवत नाहीत, पण या तिघांभोवतीच निवडणूक फिरत आहे. गुजरातच्या प्रचारात भाजप व आप एकमेकांना रोज आव्हान देताना दिसत आहेत, पण या लढाईत काँग्रेस कुठे आहे?

गुजरात व हिमाचल प्रदेश ही दोन राज्ये ऐन निवडणुकीत काँग्रेसने कोणाच्या भरवशावर सोडून दिली आहेत? काँग्रेसचे मोठे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गुंतले आहेत. या दोन्ही राज्यांत जनाधार असलेला मोठा नेता दिसत नाही. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढला आहे, पण भारत जोडो यात्रेचा मार्ग गुजरातमधून जात नाही. ही काँग्रेसची रणनीती आहे की गाफिलपणा आहे? गुजरातमध्ये निवडणुकीचा युद्धज्वर पेटलेला असताना काँग्रेसमध्ये शांतता आहे, हे कशाचे लक्षण आहे?

गुजरातमध्ये भाजप सलग सत्तावीस वर्षे सत्तेवर आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकल्या, काँग्रेसने ७७ मतदारसंघांत विजय मिळवला. तेव्हा राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचाराला वाहून घेतले होते. वेगवेगळ्या मंदिरात जाऊन मी हिंदू आहे हे ते सांगत होते. मग यावेळी ते गुजरातपासून दूर का राहिले? गुजरातमध्ये काँग्रेसकडे पारंपरिक चाळीस टक्के मतदार आहे. पण त्यातले किती भाजपकडे व किती आपकडे जातील, यावर पैजा लागत आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपने सरकार व संघटनेकडे जेवढे बारीक लक्ष दिले, तसे काँग्रेसने दिले नाही. अँटी इन्कबन्सीचा फटका नको म्हणून गेल्या वर्षी विजय रूपाणी यांचे सारे मंत्रिमंडळच घरी पाठवले व भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ भाजपने दिले.

गेल्या निवडणुकीत शेतकरी व जीएसटीमुळे व्यापारी भाजपवर नाराज होते, यावेळी नाराजीचा मुद्दा दिसत नाही. मोरबी झुलता पूल कोसळून १४० मृत्युमुखी पडले. पण निवडणुकीत तो मुद्दा होऊ शकलेला नाही. गेल्या वेळी विरोधी पक्षात असलेल्या तोफा हार्दिक पटेल व अल्पेश ठाकूर हे दोघेही भाजपमध्ये आल्याने विरोधाची धारच बोथट झाली आहे. केजरीवाल मोफत वीज, पाणी, शाळा, आरोग्य सेवा अशा घोषणांचा भडीमार करीत असले तरी त्यांना जनता किती गांभीर्याने घेईल, हे ८ डिसेंबरला मतमोजणीनंतर उघड होईल.

sukritforyou@gmail.com

sukrit@prahaar.co.in

-डॉ. सुकृत खांडेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -