Thursday, April 25, 2024
Homeकोकणरायगडपोलादपूरच्या कशेडी घाटात चोळई येथे अपघातांची मालिका सुरूच

पोलादपूरच्या कशेडी घाटात चोळई येथे अपघातांची मालिका सुरूच

ट्रेलरची डम्परला धडक; चारजण जखमी

पोलादपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई गावात सुरू असलेली अपघातांची मालिका चौपदरीकरणानंतरही अद्याप थांबलेली दिसून येत नाही. सोमवारी दुपारी पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची एका डम्परला धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये चारजण जखमी झाल्याची माहिती पोलादपूर पोलिसांकडून देण्यात आली.

सोमवार १८ जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास खेडकडून मुंबईच्या दिशेने पोकलेन मशीन घेऊन निघालेला ट्रेलर तीव्र वळण उतारावरून वेगाने येत असताना चालकाचा ताबा सुटून तो ट्रेलर आणि पोकलेन मशीनसह पोलादपूरकडून धामणदिवीच्या दिशेने जाणाऱ्या डम्परला समोरासमोर रस्त्याच्या मधोमध धडक बसली. यामुळे डम्पर आणि ट्रेलर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यावेळी ट्रेलरमधील हिरालाल राधाकिशन चौधरी (१६) आणि प्रधान रामकिशन चौधरी (२३) हे दोघेही रा. समोद, ता. नसेराबाद, जि. अजमेर, राजस्थान तसेच डम्परमधील शंकर काशिनाथ पवार (४०, जोगेश्वरी गाडीतळ, पोलादपूर) आणि तुषार नीळकंठ सावंत (३६ सह्याद्रीनगर, पोलादपूर) असे चौघेजण जखमी झाले.

यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष अजय सलागरे तसेच अन्य प्रवाशांनी घटनास्थळावरून जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी ट्रेलरचा चालक प्रधान रामकिशन चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार व्ही. जी. चव्हाण हे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -