Wednesday, September 2, 2026

Odisha Heavy Rainfall : ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; भिंती कोसळून ३ जणांचा मृत्यू, ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

Odisha Heavy Rainfall : ओडिशात मुसळधार पावसाचा कहर; भिंती कोसळून ३ जणांचा मृत्यू, ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश

भुवनेश्वर : ओडिशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. मयूरभंज आणि संबलपूर जिल्ह्यांत या दुर्घटना घडल्या. राज्यात सध्या अतिवृष्टीचा जोर असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी सुंदरगड, क्योंझर आणि मयूरभंज जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Odisha Heavy Rainfall)

मयूरभंजमध्ये दोघांचा मृत्यू :

मयूरभंज जिल्ह्यातील मटकामदिही गावात पहाटे सुमारे ४ वाजता घराची मातीची भिंत आणि कौले कोसळून ४९ वर्षीय सिंगो मुर्मू यांचा मृत्यू झाला. त्या घरात झोपलेल्या असताना ही दुर्घटना घडली. बांगीरिपोसी परिसरातही अशीच घटना घडली. भुलनपूर गावातील लक्ष्मी सिंह या घरातील सामान बाहेर काढत असताना कमकुवत झालेली मातीची भिंत अचानक त्यांच्यावर कोसळली. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. (Odisha Heavy Rainfall)

संबलपूरमध्ये तीन वर्षांच्या मुलाचा बळी :

संबलपूर जिल्ह्यातील गोविंदपूर न्यू कॉलनीमध्ये मातीची भिंत कोसळून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिंत कमकुवत झाली होती. मंगळवारी दुपारी अचानक भिंत कोसळली आणि त्याखाली चिमुकला अडकला. (Odisha Heavy Rainfall)

ओडिशाने ओलांडली सरासरी पावसाची मर्यादा :

यंदा ओडिशात पावसाने जूनच्या सुरुवातीपासूनच विक्रमी स्थिती निर्माण केली आहे. १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान राज्यात १,१५४.३ मिमी पाऊस नोंदवला गेला. या कालावधीतील सामान्य पर्जन्यमान १,१५०.२ मिमी आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच राज्याने संपूर्ण जून-सप्टेंबर मान्सूनच्या सरासरी पावसाची मर्यादा किंचित ओलांडली आहे. जूनमध्ये राज्यात ४७ टक्के पावसाची तूट होती. मात्र जुलैमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ९१ टक्के आणि ऑगस्टमध्ये १५ टक्के अधिक पाऊस झाल्याने जूनमधील तूट भरून निघाली. मयूरभंज जिल्ह्यातील बांगीरिपोसी येथे २४ तासांत ३०९.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा राज्यातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. (Odisha Heavy Rainfall)

पुरामुळे लाखो नागरिक प्रभावित :

१३ ते २६ ऑगस्टदरम्यान राज्यातील १० जिल्ह्यांमधील १,८९५ गावांतील १३.५ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला. या कालावधीत बुडणे, भिंत कोसळणे, सर्पदंश आणि पुराच्या पाण्यात वाहून जाणे अशा विविध घटनांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. (Odisha Heavy Rainfall)

कमी दाबाच्या क्षेत्रांच्या संथ हालचालीमुळे अतिवृष्टी :

हवामानतज्ज्ञ उमा शंकर दास यांच्या मते, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांची संथ हालचाल ही ओडिशातील दीर्घकाळ सुरू असलेल्या मुसळधार पावसामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यांच्या मते, सामान्यतः कमी दाबाचे क्षेत्र दिवसाला सुमारे २४० ते ३४० किलोमीटर अंतर पार करते. मात्र २५ जुलै रोजी उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने चार दिवसांत केवळ सुमारे ४७० किलोमीटर अंतर कापले. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे अशा हवामान प्रणालींच्या हालचाली मंदावण्याची शक्यता असून, त्यामुळे त्या अधिक काळ सक्रिय राहून कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पाडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Odisha Heavy Rainfall)

३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ओडिशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. सुंदरगड, क्योंझर आणि मयूरभंजमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर बालासोर, भद्रक, झारसुगुडा, बरगड, संबलपूर, देवगड, अंगुल आणि सुबर्णपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. (Odisha Heavy Rainfall)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >