Tuesday, April 23, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणीकपात

मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणीकपात

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने सोमवार दिनांक २७ जून २०२२ पासून संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत शुक्रवारपर्यंत या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा जलसाठा १५.५४ टक्के इतका होता.

दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार दिनांक २७ जून २०२२ पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -