Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! 'या' महिन्यात काम पूर्ण होणार

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात काम पूर्ण होणार

नितीन गडकरी यांनी केली महत्वाची घोषणा

मुंबई : तब्बल १२ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी हा मार्ग डिसेंबर अखेरीस पुर्ण होणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी या महामार्गाची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यांसोबत हवाई पाहणी केली.

त्यानंतर, नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा द्रुतगती महामार्गाचे विलोभनीय फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांनी आणखी काही मोठ्या घोषणा केल्या आहे.

नितीन गडकरी यांनी पाहणीदरम्यान अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच कामं न केल्यास, कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

या ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी परशुराम घाटाची देखील पाहणी केली.

भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजुरीस झालेला विलंबामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी केली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५ हजार ५६६ कोटी रुपये आहे.

काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे फोटो शेअर केले होते. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन तो सुरुही झाला आहे. हा महामार्ग पुर्ण झाल्यावर मुंबई-दिल्ली प्रवास फक्त १२ तासात होणार आहे.

पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार. आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न राहिल, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.

तसेच राज्यात सॅटेलाईट बेस टोल तयार करण्यात येणार असून कळंबोली येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यात येणार असल्याचेही आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.

अशाप्रकारे एकूण सुमारे १५ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई एअरपोर्ट येथे पोहचण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोकणातील पर्यटन वाढीसाठी ऍम्फीबीअस सी – प्लेनचे नियोजन करण्याचा विचार आहे. कोकणाचा आर्थिक, औद्योगिक विकास करण्याची गरज आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी अपघात निवारण समिती स्थापन करण्यात येणार असल्याची तसेच दर दोन महिन्यांनी बैठक घेऊन ब्लॅक स्पॉट, अपघातस्थळाची पाहणी करण्याच्या सुचनाही संबंधित विभागाला दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -