Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यऑनलाइन आणाभाका किती पोकळ?

ऑनलाइन आणाभाका किती पोकळ?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आजकाल सोशल मीडियाशी संबंधित विविध अॅप्लिकेशन वापरत नाही, असे खूपच कमी जण असतील. आजकाल लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण स्मार्ट फोनशी परिचित आहे. महिला देखील मोठ्या प्रमाणात दैनंदिन, कार्यालयीन कामकाजासाठी, व्यावसायिक कारणांसाठी, करमणुकीसाठी विविध अॅप्लिकेशन वापरताना दिसतात. टेक्नॉलॉजी जशी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, तसेच सोशल मीडियावर होणारे प्रेम देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. ऑनलाइन प्रेम करण्याचा नवा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. वास्तविक, सामाजिक माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, माहिती होतात. या प्लॅटफॉर्मचा सुयोग्य वापर करता आला, तर आपण खूप काही आत्मसात करू शकतो. अनेक सकारात्मक विषय, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक कार्य, आध्यत्मिक माहिती, आरोग्य यांसारख्या असंख्य गोष्टी आपल्याला समाज माध्यमातून (सोशल मीडिया) मिळतात. महिला तर अतिशय उत्साहाने नवीन नवीन अॅप्लिकेशन शिकून, त्याबद्दल माहिती घेऊन ते हिरीरीने वापरतात. कुतूहलापोटी त्या अनेक व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा समूहात सामील होतात. मोठ्या प्रमाणात माहितीचे आदान-प्रदान, गप्पा, फोटो, व्हीडिओ एकमेकांना शेअर करून सगळ्यांशी आपण कनेक्ट आहोत, अपडेटेड आहोत, आपल्याला समाजातील अनेक जण ओळखतात, आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतात, आपण सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आणि अॅक्टिव्ह आहोत, याचा महिलांना सार्थ अभिमान वाटतो.

अशा अॅप्लिकेशनमधील ग्रुप्सविषयी बघितलं तर, आपण जॉईन केलेल्या किंवा आपल्याला अॅड केल्या गेलेल्या ग्रुपमधील सर्व व्यक्तींचा आपल्याला परिचय नसतो. फारफार तर ग्रुप अॅडमिनला आपण थोडंफार ओळखत असतो. अनेक ग्रुपमध्ये समूहातील सदस्यांनी त्यांचे नाव, गाव त्यांच्या नंबर समोर ठेवलेले नसते. त्यामुळे कोणकोण समूहात आहे, याची बेसिक कल्पना आपल्याला नसते. कोणाचेही बॅकग्राऊंड, ठावठिकाणा, उद्योग, व्यवसाय आपल्याला माहिती नसतो. अशा परिस्थितीमध्ये देखील महिला खूपच बेसावध पद्धतीने ग्रुपवर वावरताना दिसतात. काही वेळा ग्रुपमध्ये असलेले काही पुरुष सदस्य महिला सदस्यांना विनाकारण वैयक्तिक मेसेज, फोन करताना दिसतात. यावेळी महिला कोणत्या पद्धतीने, कसा प्रतिसाद देते यावर पुढील कथानक अवलंबून असते. आपण पाहतो की, आजकाल अनेक प्रेमकथांचा जन्म सोशल मीडियामधूनच होत आहे. प्रेमाच्या आणि प्रेम करण्याच्या संकल्पनेमध्ये आमूलाग्र बदल आताशा झालेला दिसतो.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या महिलांना वैयक्तिक मेसेज, फोन केले जातात, त्यांच्याशी ओळख वाढवली जाते, त्यांच्या फोटोचं कौतुक केलं जातं आणि त्यांच्याशी सातत्याने संवांद ठेवायला सुरुवात होते. वैयक्तिक माहितीची देखील देवाणघेवाण होते. सोशल मीडियाद्वारे भेटणारी, ओळख झालेली प्रत्येक नवीन व्यक्ती चुकीची किंवा त्रासदायक नक्कीच नसते. पण काही वेळा चुकीच्या लोकांना प्रतिसाद दिला गेल्यास, त्यांचा हेतू लक्षात न आल्यास, अथवा जास्तच विश्वास ठेवला गेल्यास महिलांना स्वतःच्याच अशा उतावीळपणे वागण्याचा त्रास सहन करावा लागतो.

आपली जी स्वप्न, जे विचार, ज्या अपेक्षा प्रत्यक्ष जीवनात पूर्ण होत नसतात त्या पूर्ण करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यात काही चुकीचं नाही, प्रत्येकाचं स्वतःचं असं एक मन असतं, ज्यामध्ये तो स्वतःच्या फॅन्टसी पूर्ण करण्याची स्वप्न पाहत असतो. आजकाल मोबाईलमुळे, अनेकांच्या संपर्कात राहता येत असल्यामुळे, नवनवीन अॅप्लिकेशनमार्फत संवाद साधणे सोपे झाल्यामुळे आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक जण धडपडताना दिसतोय. सोशल मीडियाद्वारे जी आभासी दुनिया आपल्याला खुणावत असते तिच्या किती आधीन जायचं, हे ठरवणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.

महिला मुळातच भावनाप्रधान असल्याने त्यांना या स्वरूपाच्या आभासी प्रेमाची पटकन भुरळ पडते. महिलांना हे समजत नाही की, जरी त्यांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन प्रेम प्रकरणात भावना गुंतवल्या असतील, तरी त्या कोणत्या मर्यादेपर्यंत असाव्यात? चॅटिंग करताना आपली तसेच समोरच्याची भाषाशैली, भाषेचा दर्जा किती घसरू द्यावा, समोरून चुकीच्या व्हीडिओ अथवा फोटोची मागणी झाल्यास ती पूर्ण करावी का? ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष ओळखत नाही, भेटलेलो नाही किंवा अतिशय अल्पपरिचय ज्या व्यक्तीबाबत आपल्याला आहे, त्याला आपले स्वतःचे अश्लील फोटो अथवा व्हीडिओ अथवा आपली वैयक्तिक माहिती अतिशय कमी कालावधीच्या परिचयात पाठवणे कितपत योग्य आहे?

हे सगळे करत असताना महिला मात्र समोरच्या व्यक्तीचं चॅटिंगवर केलेलं हितगुज खरं समजून आपल्या सर्व भावना, विश्वास, प्रेम समर्पित करून त्याच्या ऑनलाइन मागण्या पूर्ण करीत असते. आभासी आणि ऑनलाइन प्रेम देखील महिला समरस होऊनच करते, कारण ती त्या व्यक्तीपासून शरीराने दूर असली तरी मनाने पूर्ण गुंतलेली असते. पुरुष मात्र अशा प्रेमाला किती गांभीर्याने घेतात? त्यांच्या भावना तितक्यात समर्पित असतात का? की केवळ काही मिनिटांसाठी असे फोटो, व्हीडिओ एन्जॉय करून ते विसरून जातात. अशा प्रकारचे सामाजिक माध्यमातून केले गेलेले स्त्री-पुरुषाचे प्रेम, पुरुषाने महिलेकडे याच माध्यमातून केलेल्या विविध मागण्या, भेटण्याचे, फिरण्याचे केलेले प्लॅन, दिलेली वचनं किती तात्पुरती आणि पोकळ असतात, हे समुपदेशनला आलेल्या अनेक प्रकरणांमधून लक्षात येते.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -