सह्याद्रीच्या कडेकपारीतून, लाल-काळ्या मातीतून, नदी-सागराच्या तळातून मौल्यवान रत्न शोधण्याचे काम एखादा निष्णात जवाहिरच करू शकतो. १६ वर्षे एखाद्या कार्यात सातत्य राखत, नवनवीन अमूल्य रत्नांचा गौरव करताना, प्रत्येक सोहळा आधीपेक्षा अधिक दिमाखदार करणे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे फक्त ‘सह्याद्री’ वाहिनीच करू शकते, अशा भावना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल्या. गोदरेज न. १ प्रस्तुत १६ वा ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कार सोहळा नुकताच रवीन्द्र नाट्य मंदिरात संपन्न झाला.मुंबई – सह्याद्रीच्या कडेकपारीतून, लाल-काळ्या मातीतून, नदी-सागराच्या तळातून मौल्यवान रत्न शोधण्याचे काम एखादा निष्णात जवाहिरच करू शकतो. १६ वर्षे एखाद्या कार्यात सातत्य राखत, नवनवीन अमूल्य रत्नांचा गौरव करताना, प्रत्येक सोहळा आधीपेक्षा अधिक दिमाखदार करणे खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे फक्त ‘सह्याद्री’ वाहिनीच करू शकते, अशा भावना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केल्या. गोदरेज न. १ प्रस्तुत १६ वा ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कार सोहळा नुकताच रवीन्द्र नाट्य मंदिरात संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी गोदरेज नं १ ‘सह्याद्री नवरत्न पुरस्कार’ सोहळ्यात कला, नाटय़, सिनेसृष्टी, सेवा, पत्रकारिता, साहित्य, संगीत, शिक्षण, महिलासबलीकरण आदी क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या नवरत्नांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यंदाच्या १६ व्या ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्काराचे मानकरी चित्ररत्न ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, स्वररत्न शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाट्यरत्न ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, साहित्यरत्न पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, सेवारत्न क्षयरोगतज्ज्ञ डॉ. एच. एस. भानुशाली, शिक्षणरत्न रमेश पानसे, रत्नशारदा बेबीताई गायकवाड, कलारत्न चित्रकार सुहास बहुलकर, रत्नदर्पण – अ‍ॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण तसेच गोदरेज नं. १ फ्रेश फेस ऑफ दी इयर गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आदी पुरस्कार्थींना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर, डॉ. विजया वाड, डॉ. अनिल काकोडकर, ओल्गा डीमेलो, डॉ. निशिगंधा वाड, शिल्पकार भाऊ साठे, ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले तसेच गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट विभागाचे उपसंचालक अनुप गोयल, कपिलदेव पिल्लाई, मार्केटिंग विभाग प्रमख, गोदरेज कन्ज्युमर प्रॉडक्ट लिमिटेड आदी मान्यवर उपस्थित होते. निवड समितीत कमलाकर सोनटक्के, कुमार केतकर, अशोक पत्की, मुग्धा कर्णिक, रेखा नार्वेकर यांचा सहभाग होता. हा सोहळा सह्याद्री वाहिनीवर रविवार २५ जून रोजी संध्याकाळी ४.३० वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे.